
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड-भोकर रस्त्यावर पांढरवाडी येथे मंगळवारी बस आणि कारची जबर धडक झाली. यात पाटनूरचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच बच्चुराज देशमुख पाटनूरकर हे जागीच ठार झाले. तर त्यांची आई अंजनाबाई बळवंतराव देशमुख आणि बहिण कमलबाई भाले यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी 11 वाजता पाटनूरहून नांदेडकडे एमएच 26, 2556 या कारने बच्चुराज देशमुख हे आपली बहिण व आईसह नांदेडकडे निघाले होते. पांढरवाडी फाटा येथे एमएच-06-एस-8732 या बसने त्यांच्या गाडीला धडक दिली. या धडकेत उपसरपंच तथा काँग्रेसचे कार्यकर्ते बच्चुराज देशमुख पाटनूरकर हे जागीच ठार झाले. तर त्यांची आई अंजनाबाई बळवंतराव देशमुख आणि बहिण कमलबाई साहेबराव भाले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
बच्चुराज देशमुख हे अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक होते. ते सध्या पाटनूरचे उपसरपंच म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अचानक निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पोलीस रवाना झाले असून, घटनेचा अधिक तपास बारड पोलीस करीत आहेत.


























































