
>> गणेश आचवल
नव्या वर्षात नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. याच महिन्यात ‘पिकोलो’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि यात ‘प्रीती ’ ही प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी कासार…. एक प्रॉमिसिंग चेहरा.
एकांकिकांपासून ते चित्रपटापर्यंतचा अश्विनी कासार हिचा प्रवास खूपच महत्त्वाचा आहे. अश्विनीचं शालेय शिक्षण बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरमध्ये मराठी माध्यमात झालं. त्यानंतर तिने रुईया कॉलेजला ऍडमिशन घेतली. रुईयात असताना ‘नाटय़वलय’मधून अनेक एकांकिका स्पर्धांतून ती सहभागी झाली. ग-म-भ-न, मुक्तिधाम, अनन्या, कुंकू टिकली टॅटू या एकांकिका तसेच युवा महोत्सवातील अनेक एकांकिकांमध्ये तिचा सहभाग होता, पण नाटकांबरोबरच शिक्षणक्षेत्रही महत्त्वाचे आहे, हा दृष्टिकोन ठेवून अश्विनीने ग्रॅज्युएशननंतर एलएलबीदेखील केलं आणि हायकोर्टात काही काळ प्रॅक्टिसिंग वकील म्हणून कामदेखील केलं. तिने भरतनाटय़म विशारद पूर्ण केलं आहे. प्रायोगिक नाटक आणि नृत्य अशा कलांकडे तिचा ओढा होताच. शेवटी तिने पूर्णवेळ अभिनय करायचं ठरवलं आणि या वेळी तिला तिच्या आई-बाबांनी दिलेला पाठिंबा खूप महत्त्वाचा होता.
‘कमला’ मालिकेतील तिची शीर्षक भूमिका लोकप्रिय झाली. तसेच ‘सावित्रीज्योती’ मालिकेतील सावित्रीबाई फुले यांच्या तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेचंसुद्धा कौतुक झालं. कट्टीबट्टी, मोलकरीण बाई, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकांत तसेच ‘सोयरे सकळ’, ‘ग-म-भ-न’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकांत तिच्या भूमिका होत्या.
‘पिकोलो’ या आगामी चित्रपटातील भूमिकेबद्दल ती सांगते, यात मी ‘प्रीती’ या गिटारवादक मुलीची भूमिका करत आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. कोकणच्या पार्श्वभूमीत हा चित्रपट घडतो. कला आपल्याला जगायचं कसं ते शिकवते हा मुद्दादेखील यात मांडला आहे. या चित्रपटासाठी मी गिटार शिकले आहे. प्रीती आणि व्हिक्टर (प्रणव रावराणे) यांची ही कथा असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिजित वारंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातून मी आजच्या काळातल्या मुलीचे प्रतिनिधित्व करत असून मी जशी आहे तशी या भूमिकेतून दिसणार आहे, असे अश्विनीने सांगितले.































































