
हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील क्रिकेटचा सामना पाहणे क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. क्रिकेटच्या मैदानावर रंगणाऱ्या या महासंग्रामाची क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या वेळी टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानचा 10 विकेट्सने दारुण पराभव केला होता. परंतु या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता रोहित शर्माकडे चालून आली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आशिया कप सुरू होणार आहे. यंदा ही स्पर्धा श्रीलंकेमध्ये आयोजित करण्यात आली आहे. टी-20 फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार असून 27 ऑगस्टपासून याची सुरुवात होईल. याच आशिया कपमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना रंगणार आहे.
प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार 28 ऑगस्टला दोन्ही संघ एकमेकांना भिडताना दिसतील. 28 ऑगस्टला रविवार असून आशियाई क्रिकेट काउन्सिलसह ब्रॉडकास्टर्स या सामन्यातील जास्तीत जास्त टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे हा रविवारचा दिवस निवडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अर्थात आशियाई क्रिकेट काउन्सिल किंवा बीसीसीआयने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
विक्रम हिंदुस्थानच्या बाजूने
टी-20 च्या एकूण रेकॉर्डवर नजर टाकली हिंदुस्थानचा संघ वरचढ ठरल्याचे दिसते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, यात हिंदुस्थानने 7 तर पाकिस्तानने 2 सामने जिंकले आहेत.
हिंदुस्थान गतविजेता
आशिया कपमध्ये हिंदुस्थान, यजमान श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशने आपली जागा पक्की केली आहे. यासह यूएई, नेपाळ, ओमान, हॉन्गकॉन्ग आणि अन्य संघांमध्ये क्वालिफायर राऊंड खेळला जाईल. हिंदुस्थानचा संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरेल. गेल्या वेळी हिंदुस्थानने फायनलमध्ये बांगलादेशचा पराभव करत आशिया कप जिंकला होता. हिंदुस्थानने आतापर्यंत सर्वाधिक सात वेळा (1984, 1988, 1990/91, 1995, 2010, 2016) आशिया कप जिंकला आहे.



























































