दिव्यांगांना सक्षम करणारा अस्मिता उपक्रम; कलात्मक वस्तूंच्या विक्रीतून रोजगार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अस्मिता केंद्रातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांना विविध कलात्मक वस्तूंचे प्रशिक्षण दिले जाते. 18 वर्षांवरील दिव्यांगांना  हस्तकला, शिवणकाम, चित्रकला यांचे धडे देण्यात येतात. संस्थेच्या मुलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री केली जाते. त्यातून दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. केंद्रप्रमुख सुधा तेंडुलकर-दळवी आहेत, तर संचालक शेखर पारखी आहेत. प्रशिक्षकांच्या मागदर्शनाखाली मुले स्वतःचे कलाकौशल्य दाखवतात आणि खूप सुंदर, कलात्मक वस्तू बनवतात. यामध्ये पर्स, बॅग, पॉकेट्स,  वॉल हँगिंग,  ट्रव्हेल बॅग, फोल्डिंग व्हेजिटेबल बॅग, ऑफिस बॅग, वेगवेगळी कव्हर्स, (साडी, ब्लाऊज, शर्ट, नॅपकिन शूज कव्हर्स) आणि त्यावर हॅण्ड पेंटिग्ज यांचा समावेश आहे.

नुकतेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या तिरंगा फुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ही खास फुले तयार केली होती बोरिवलीच्या अस्मिता अस्थिव्यंग प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्राच्या मुलांनी. केवळ तिरंगी फुलेच नव्हे, अनेक कलात्मक वस्तू ही मुले तयार करत आहेत. त्यांच्या विक्रीतून मुलांना रोजगारही मिळत आहे.

दिव्यांग मुले डुप्लेक्स पेपरपासून विविध फुले तयार करतात. मंजिरी काळे या हस्तकला विभाग शिक्षिका आहेत. खरंतर ही त्यांची संकल्पना आहे. अंकित पडेलकर हा दिव्यांग मुलगा तिरंगी फुले तयार करतो. तिरंगी फुले प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर फुलदाणीत ठेवता येतात. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक मर्यादा असूनही अंकितने 15 दिवसांत 300 हून अधिक फुले एकटय़ाने तयार करून प्रत्येक ऑर्डर वेळेत पूर्ण केली. मुलांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तूंना खूप चांगला प्रतिसाद मिळतो. अशी माहिती संस्थेच्या कार्यकर्त्या बागेश्री देशपांडे यांनी दिली. संपर्क 7208479919/7666713441.