मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या

आसाममध्ये मोठ्या अपघाताचा अनर्थ टळला आहे. ईशान्य सीमावर्ती रेल्वेच्या अलीपुरद्वार विभागातील सालाकाटी आणि कोक्राझार स्थानकांदरम्यान गुरुवारी रेल्वे रुळांवर एक संशयास्पद स्फोट झाला. हा स्फोट मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास झाल्याचे वृत्त आहे.

या अपघातामुळे आठ ते दहा गाड्या उशिराने धावल्या. सकाळी 5.25 वाजेपर्यंत ट्रॅक दुरुस्त करण्यात आला आणि सकाळी 5.30 वाजता रेल्वे सेवा सुरळीत झाली. आता विभागात गस्त वाढविण्यात आली आहे. या भागातून एक मालगाडी जात असताना तिला हादरा बसला, ज्यामुळे ट्रेन थांबावी लागली. तपासणीत ट्रॅक आणि स्लीपरचे नुकसान झाल्याचे उघड झाले, ज्यामुळे स्फोट झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. कोकराझारमध्ये रेल्वे ट्रॅकचे नुकसान झाल्याचे कळले. जे स्फोटामुळे झाले होते. आता दुरुस्तीचे काम पूर्ण केले असून ट्रेन सुरळीत सुरु करण्यात आल्याचे रेल्वे पोलीस सुप्रिडेण्ट प्रांजीत बोरा यांनी सांगितले.

रेल्वे लोको पायलटने बुधवारी रात्री रेल्वे रुळावर काहीतरी गडबड असल्याचे सांगितले होते. जिल्हा पोलिस आणि जीआरपी आले आणि त्यांनी चौकशी केली. एका रुळाचे नुकसान झाल्याचे लक्षात आले. हा संशयास्पद स्फोट असू शकतो.  आत्ताच निश्चितपणे काहीही सांगणे योग्य ठरणार नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर तपशील शेअर केला जाईल… जर हा घातपात असेल तर तो कोणी केला आणि कोण यात सहभागी आहे हे शोधून काढावे लागेल असे बोरा म्हणाले.