मेक्सिकोत ड्रग माफियात गँगवॉर, 11 ठार, 9 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर मेक्सिकोतील बाजा कॅलिफोर्नियामध्ये एका कार शोमध्ये झालेल्या गोळीबारात 11 रोड रेसर्स ठार झाले तर 9 जण जखमी झाले. अ‍ॅटर्नी जनरलच्या कार्यालयाने सांगितले की, एन्सेनाडा शहरातील सॅन व्हिसेंटे भागात ऑल टेरेन कार रेसिंग शोदरम्यान हा हल्ला झाला. ड्रगमाफियांमध्ये ही गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, हल्लेखोर ग्रे व्हॅनमधून आले होते. त्यावेळी रेसमध्ये सहभागी झालेले रेसर्स गॅस स्टेशनवर उभे होते. त्यानंतर हल्लेखोरांनी उपस्थितांवर गोळीबार सुरू केला. हल्ल्यानंतर राज्य पोलीस, मरीन, अग्निशमन दल आणि मेक्सिकन रेड क्रॉसचे पथक घटनास्थळी पोहोचले. महापौर अरमांडो अयाला रोबल्स म्हणाले की, राज्याचे अ‍ॅटर्नी जनरल रिकार्डो इव्हान कार्पियो-सँचेझ यांनी गोळीबाराची चौकशी करण्यासाठी एक विशेष टीम तयार केली आहे. तथापि, पीडितांची ओळख आणि राष्ट्रीयत्व अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाही. मेक्सिकन रेड क्रॉसने जखमींना उत्तर बाजा कॅलिफोर्नियातील हॉस्पिटलमध्ये नेले. या गोळीबारानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला होता.