
मालाडच्या पिंपरीपाडय़ातील एटीएम सेंटर फोडण्याच्या तयारीत असणाऱया टोळीच्या कुरार पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सिद्धेश इंगळे, सुबोध साळवी, समीर खान, समीर पार्टे आणि सौरभ पार्टे अशी त्यांची नावे असून त्या पाच जणांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीकडून एक नकाशा पोलिसांनी जप्त केला आहे.
कुरारच्या पिंपरीपाडय़ातील एका खासगी बँकेचे एटीएम फोडण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बेळे यांच्या पथकातील पांचाळ, भोये, भुरे, सातार्डेकर,पाटील, तांबे, वेदांते, तांबोळी यांच्या पथकाने सध्या वेशात सापळा साचला. आज पहाटेच्या सुमारास तीन मोटरसायकलवर आठ जण आले. पोलिसांना पाहताच ते पळून लागले. पळून जात असलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर अंधाराचा फायदा घेऊन तीन जण पळून गेले आहेत. या टोळीकडून दोन सुरे, दोन कटावणी, नॉयलॉनची दोरी, मिरची पूड, क्रू ड्रायव्हर, तीन बाईक आणि कॅश जप्त केली आहे. त्या पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चोरीच्या मोटरसायकलींचा वापर
या टोळीकडून पोलिसांनी तीन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. त्यातील दोन मोटरसायकलींचा नंबर हा बनावट असून त्या चोरीच्या असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या मोटरसायकल कोणाच्या आहेत त्याचा शोध घेतला जात आहे. तर एक मोटरसायकल ही एका आरोपीची आहे.



























































