सिल्लेखान्यात गोरक्षक आणि पोलिसांवर दगडफेक

27

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

कत्तलीसाठी आणण्यात येणाऱ्या गायींची सुटका करण्यासाठी सिल्लेखान्यात गेलेल्या गोरक्षकांसह पोलिसांवर टोळक्याने तुफान दगडफेक केली. यात वाहनाच्या काचा फुटून तोडफोड झाली आहे. व्हॅन नसल्याने गोरक्षकांच्याच खासगी वाहनातून पोलीस घटनास्थळी गेले होते. टोळक्याने मुजोरी करत हल्ला चढविल्यामुळे साध्या वेषातील हे पोलीस माघारी परतले. नंतर व्हॅन मागवण्यात आली. दरम्यान, सिल्लेखान्यात तणावाचे वातावरण असून, स्ट्रायकिंग फोर्सला पाचारण करण्यात आले आहे.

राज्यात गोहत्याबंदी असताना संभाजीनगरातील सिल्लेखान्यात सर्रास गायींची कत्तल होत आहे. त्यातच बुधवारी रात्री गायींनी भरलेला टेम्पो येणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. पाच ते सहा गोरक्षकांनी मोंढा भागातून टेम्पोचा पाठलाग सुरू केला. काही कार्यकर्त्यांनी क्रांती चौक ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल काटमांडे यांना फोन करून माहिती दिली. काटमांडे तातडीने सिल्लेखान्याकडे निघाले. गोरक्षकांनी त्यांना आपल्या कारमध्ये बसवून घेतले आणि टेम्पोचा पाठलाग सुरू ठेवला. टेम्पोमागोमाग खासगी कार सिल्लेखान्यात धडकताच टोळक्याने चाल करत तुफान दगडफेक केली. यात कारच्या (एमएच-२०सीएच ७३९१) काचा फुटल्या. बरीच तोडफोडही झाली. जमाव अंगावर येत असल्याचे पाहून उपनिरीक्षक काटमांडे यांनी कार पोलीस ठाण्याकडे घेतली आणि मोबाईल व्हॅनला पाचारण केले. दरम्यान, सिल्लेखान्यात प्रचंड गोंधळ उडाला. परिस्थिती तणावग्रस्त बनली. त्यामुळे नियंत्रण कक्षातून स्ट्रायकिंग फोर्सला पाचारण करण्यात आले. गायींच्या टेम्पोचा शोध लागलेला नसून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गोरक्षकांवरील हल्ल्याची माहिती मिळताच युवासेनेचे जिल्हाधिकारी, नगरसेवक ऋषीकेश खैरे, आनंद तांदुळवाडीकर, अॅड. आशुतोष डंख, बळीराम देशमाने, विकास लुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ऋषीकेश खैरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, सिल्लेखान्यात गायी आल्यावर गोरक्षक आमच्या घरात येतात, असा आरोप करून पोलिसांनी कारवाई करावी, असे एमआयएमचे शेख मतीन, नासेर खान, जावेद कुरेशी यांनी म्हटले आहे.

आयुक्त घटनास्थळी, माध्यम प्रतिनिधींना माहिती देणे टाळले
सिल्लेखान्यातील घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह अधिकारी घटनास्थळी आले. घटनेच्या वार्तांकनासाठी आलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना मात्र कोणीही पोलीस अधिकारी माहिती देत नव्हता. क्रांतीचौक ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी तर ‘ठाण्यात येऊ नका’ असे म्हणत पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

मेसवरून परतणारा विद्यार्थी जखमी
खानावळीत जेवण करून रूमवर परतणारा विद्यार्थी जमावाच्या दगडफेकीत जखमी झाला आहे. त्याच्या हात व पायाला दुखापत झाली आहे. ज्ञानेश्वर जवंजाळ असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळ बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील नायगाव बुद्रुकचा आहे. पोलीस व्हॅन आल्यानंतर त्याची जमावाच्या तावडीतून सुटका झाली. पोलिसांनी विचारपूस करून ज्ञानेश्वरला उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले.

आपली प्रतिक्रिया द्या