
अत्यंत थरारक वळणावर पोहोचलेल्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा मालिकेत बरोबरी साधण्याचा संकल्प उधळून लावत पाकिस्तानविरुद्ध सलग सोळाव्या विजयाची नोंद करत मेलबर्नवर मालिका विजयाचा सोहळाही साजरा केला. ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी विजय मिळवित तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. आता तिसरी आणि शेवटची कसोटी 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू होईल.
मेलबर्न कसोटीत पाकिस्तानने गुरुवारीच थरारक रंग भरले होते. गुरुवारच्या 6 बाद 187 या धावसंख्येवर असलेल्या ऑस्ट्रेलियन डावाला ऍलेक्स कॅरीच्या 53 धावांच्या संयमी खेळीमुळेच त्यांचा डाव अडीचशेचा टप्पा ओलांडू शकला. कॅरीने शेवटच्या 4 विकेटबरोबर 22, 22, 12 आणि 13 धावांची भागी रचत गुरुवारच्या धावसंख्येत 75 धावांची भर घातली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 317 धावांचे जबरदस्त आव्हान ठेवले. पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदी आणि मीर हमजा या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी 4-4 विकेट घेत कसोटीत रंगत आणली.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान विजयरथ
ऑस्ट्रेलियाने 1996 पासून सुरू केलेला कसोटी विजयाचा धडाका आजही कायम राखला आहे. गेल्या 28 वर्षांत ऑस्ट्रेलियन भूमीवर झालेल्या पाच मालिकांमध्ये निर्भेळ यश मिळवताना सलग 14 विजय नोंदवले होते आणि आता सलग दोन्ही कसोटी सामन्यांत पाकिस्तानचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने मालिका विजयाचा उत्तुंग षटकारही ठोकला. सलग 16 कसोटींत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ‘नॉनस्टॉप’ पराभव करत एक विक्रमच रचला आहे.
रिझवान-सलमानचा संघर्ष
विजयापासून 157 धावा दूर असणाऱया पाकिस्तानचा अर्धा संघ बाद झाला होता. अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाचे पारडे जड होते. पण तेव्हा मोहम्मद रिझवान आणि आगा सलमानने सहाव्या विकेटसाठी 57 धावांची भागी रचत कसोटीतला थरार वाढवला. पाक विजयापासून 98 धावा दूर होता, मैदानात रिझवान-सलमान उभे असल्यामुळे यजमानांचे धाबे दणाणले होते. पण शेवटच्या सत्रात पॅट कमिन्सच्या अचूकतेने सामन्याचा सारा नूरच पालटवला. रिझवानची विकेट काढत कमिन्सने पाकिस्तानला हादरवले. मग पुढच्याच षटकात आमीर जमालचा शून्यावर स्वतःच झेल घेतला. मग शाहिन आफ्रिदीला बाद करत पाकिस्तानला पराभव समीप नेत डावात पाच आणि कसोटीत दहा विकेट टिपण्याची कमाल कमिन्सने केली. एक बाजू लावून धरलेल्या आगा सलमानच्या झुंजार 50 धावांची खेळी स्टार्कनेच संपवली. मीर हमजाचा विकेटही स्टार्कनेच काढला. 237 या धावसंख्येवर पाकिस्तानचे तीन फलंदाज बाद झाले आणि शेवटच्या चारही फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही.
पाकिस्तानचा जोरदार पाठलाग
विजयासाठी 317 धावांचा पाठलाग करणाऱया पाकिस्तानला अब्दुल्ला शफिकने (4) निराश केले. इमामुल हक दुसऱया डावातही पाकिस्तानच्या डावाला हातभार लावू शकला नाही. त्यामुळे 49 धावांतच पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. मात्र त्यानंतर मसूदने कर्णधारास साजेशी 60 धावांची शानदार खेळी करताना बाबर आझमसह (41) तिसऱया विकेटसाठी 61 धावांची भागी रचत कसोटीत जान आणली. मसूदने पहिल्या डावातही 54 धावा काढल्या होत्या, पण मसूद बाद झाल्यावर बाबर आणि सऊद शकीलने काही काळ किल्ला लढवत संघाला दीडशतकापर्यंत नेले. पण हेझलवूडने बाबरचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. मग शकीलचा अडसर स्टार्कने दूर करत ऑस्ट्रेलियाचा 5 बाद 162 अशी अवस्था केली.


























































