हिंदुस्थानला कोहलीची अनुपस्थिती जाणवणार, ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांचे स्पष्ट मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र या बहुप्रतिक्षित मालिकेची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगू लागली आहे. दोन्ही संघांतील खेळाडू या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. यावेळी मात्र पत्नी अनुष्का शर्मा हिच्या बाळंतपणासाठी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मायदेशात जाणार असून त्यामुळे त्याला तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.

याचवेळी ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले, विराट कोहली हा महान खेळाडू आहे. त्यामुळे त्याची अनुपस्थिती टीम इंडियाला नक्कीच जाणवणार. मात्र गेल्या दौऱयात हिंदुस्थानी संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले आहे. हा संघ बलाढय़ आहे. त्यामुळे विराट कोहली असो किंवा नसो आमचा संघ आत्मसंतुष्ट असणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

जस्टीन लँगर पुढे म्हणाले, विराट कोहली हा माझ्या क्रिकेट कारकीर्दीत बघितलेला सर्वोत्तम फलंदाज आहे. तो फलंदाज म्हणून महान आहेच. पण क्रिकेटच्या मैदानातील त्याचा उत्साह व खेळाबाबतचे प्रेम वाखाणण्याजोगेच आहे. म्हणूनच त्याचाबद्दल कमालीचा आदर आहे. तसेच पुटुंबासाठी त्याने कसोटी मालिकेतील तीन सामन्यांमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा हा निर्णय हाही योग्यच आहे, असेही त्यांनी नमूद केले.

टीम इंडियामध्ये स्टार खेळाडूंची फौज – नॅथन लायन
विराट कोहली कसोटी मालिकेतील फक्त एकाच कसोटीत खेळणार आहे. तो महान फलंदाज आहे. त्याच्यासमोर गोलंदाजी करायला मिळणार नाही. याची निराशा आहे. पण टीम इंडियामध्ये विराट कोहलीसह आणखी स्टार फलंदाज आहेत. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांच्यासह अव्वल दर्जाचे युवा खेळाडू त्यांच्या संघात आहेत. त्यामुळे विराट कोहली संघात नाही म्हणून आम्ही मालिका सुरू होण्याआधीच विजयी झालो असे म्हणता येणार नाही. मैदानात मेहनत करावीच लागणार आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायन याने व्यक्त केले.

दोन देशांमधील कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी – 17 डिसेंबर – 21 डिसेंबर (अॅडलेड)
दुसरी कसोटी – 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर (मेलबर्न)
तिसरी कसोटी – 7 ते 11 जानेवारी (सिडनी)
चौथी कसोटी – 15 ते 19 जानेवारी (ब्रिस्बेन)