ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी; मार्श, मॅक्सवेल, हेझलवूड चमकले, सॅम बिलिंग्सची शतकी खेळी वाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 मालिका गमावणाऱया ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या पहिल्या वन-डे लढतीत यजमान इंग्लंडवर 19 धावांनी विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अवघ्या 26 धावांच्या मोबदल्यात तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवणाऱया जोश हेझलवूड याची ‘प्लेअर ऑफ दी मॅच’ म्हणून निवड करण्यात आली. आता दोन देशांमध्ये उद्या दुसरा वन डे सामना खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 295 धावांचा पाठलाग करणाऱया इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. जोश हेझलवूडने खेळपट्टीचा फायदा घेत अचूक टप्प्यात गोलंदाजी केली. त्याने जेसन रॉय व जो रूट या दोन मॅचविनर फलंदाजांना तंबूत पाठवत यजमानांना मोठा धक्का दिला. त्यानंतर फिरकीपटू ऍडम झाम्पाने कर्णधार ओएन मॉर्गन व जोस बटलर यांना झटपट बाद केले. जॉनी बेअरस्टॉ (84 धावा) व सॅम बिलिंग्स (118 धावा) यांनी इंग्लंडच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. ऍडम झाम्पानेच जॉनी बेअरस्टॉला जोश हेझलवूडकरवी झेलबाद केले. सॅम बिलिंग्सने वन-डे कारकीर्दीतील पहिली शतकी खेळी करताना दोन षटकार व 14 चौकारांची बरसात केली.

126 धावांची निर्णायक भागीदारी

मार्क वूड, जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी मार्यासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची दैना उडाली. डेव्हिड वॉर्नर (6 धावा), ऍरोन फिंच (16 धावा), मार्कस स्टोयनीस (43 धावा), मार्नस लॅबुशेन (21 धावा), ऍलेक्स कॅरी (10 धावा) यांना अपयशाचा सामना करावा लागला. मिचेल मार्श व ग्लेन मॅक्सवेल या जोडीने 5 बाद 123 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरूवात केली. दोघांनी 126 धावांची सणसणीत भागीदारी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले. ग्लेन मॅक्सवेलने चार षटकार व चार चौकारांसह 77 धावांची, तर मिचेल मार्शने सहा चौकारांसह 73 धावांची खेळी साकारली आणि ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.