
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा माजी क्रिकेटपटू जस्टीन लँगर याने राजीनामा दिला आहे. ऑस्ट्रेलियाला T20 विश्वचषक स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून देण्यात आणि अॅशेस मालिकेत 4-0 ने विजय मिळवून देण्याच लँगरचा मोठा वाटा होता. लँगर यांना मुदतवाढ मिळावी यासाठी ऑस्ट्रेलियाच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी मागणी केली आहे. शुक्रवारी प्रशिक्षकपदाबाबत निर्णय घेण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बैठक बोलावली होती, मात्र या बैठकीत काहीच निर्णय झाला नव्हता. शनिवारी जस्टीन लँगर याच्या व्यवस्थापन कंपनीने तो प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले.
Langer made the call on Saturday after extensive meetings with the Cricket Australia board.
More 👇https://t.co/RkNaZSL6Ma
— ICC (@ICC) February 5, 2022
अपराजित आणि बलाढ्य संघ अशी ओळख निर्माण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचे मनोबल काही वर्षांपूर्वी खच्ची झाले होते. संघातील प्रमुख खेळाडूंची निवृत्ती, एकामागोमाग एक स्वीकारावे लागलेले पराभव यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अचानक दुबळा वाटायला लागला होता. जस्टीन लँगर याने संघावर अपार मेहनत घेत त्यांना पुन्हा विजयी मार्गावर आणून ठेवले होते. लँगरची कामगिरी उत्तम असली तरी त्याचे संघातील क्रिकेटपटूंशी असलेले संबंध फार चांगले नाहीत अशी चर्चा ऐकू येत होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेली क्रिकेट ऑस्ट्रेलियाची बैठक महत्वाची मानली जात होती. या बैठक काहीही निर्णय न झाल्याने लँगरने स्वत:हून प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
2018 साली ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारणाऱ्या लँगरने वैयक्तिक कारणांसाठी रजा घेण्याचं ठरवलं होतं. त्याच्या रजेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरूद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 11 फेब्रुवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. लँगरच्या अनुपस्थितीत अँड्र्यू मॅकडोनाल्ड हा संघाचं प्रशिक्षकपद भूषविणार आहे. तोच लँगरचा उत्तराधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे.


























































