माजी पंतप्रधानांच्या हत्येचा कट, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या भावाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून 6 डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या चमूमधील प्रसिद्ध क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऑस्ट्रेलिया पोलिसांनी उस्मान ख्वाजाचा भाऊ अर्सलान स्वाजा (39) याला बोगस दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यासाठी एका व्यक्तीला चेतावल्याप्रकरणी अटक केली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ऑगस्टमध्ये पोलिसांनी श्रीलंकेच्या एका विद्यार्थ्यांना सिडनी येथे अटक केली होती. पोलिसांनी अट केलेल्या विद्यार्थ्यांकडून ऑस्ट्रेलियाच्या राजकीय नेत्यांच्या हत्येची योजना लिहिलेली एक वही मिळाली होती. तपासाअंती पोलिसांनी अटक केलेल्या मोहम्मद कमीर निजामुद्दीन याला एका महिन्याने सोडून दिले. 25 वर्षीय या विद्यार्थ्यांना आपल्याला फसवण्यात आल्याचा दावा केला.

काय होतं त्या वहीमध्ये?

पोलिसांनी अटक केलेल्या निजामुद्दीनची चार आठवडे कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडे मिळालेल्या वहीच्या आधारे त्याच्यावर दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला. या वहीमध्ये नोंद असणाऱ्या ऑस्ट्रेलियन राजकारणी व्यक्तींमध्ये माजी पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांचे देखील नाव होते. याच संबंधी पोलिसांनी अर्सलान ख्वाजा याला अटक करून त्यानेच निजामुद्दीनला अतिशय योजनाबद्ध पद्धतीने फसवल्याचा आरोप केला. ज्या ठिकाणी निजामुद्दीने शिकत होता त्याच ठिकाणी अर्सलान ख्वाजा देखील होत, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांवर भरपाईचा दावा

दरम्यान, हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर निजामुद्दीन श्रीलंकेमध्ये परतला असून त्याने ऑस्ट्रेलिया पोलिसांवर भरपाईचा दावा ठोकला आहे. या प्रकरणी आपल्या वर्तनाबाबत ऑस्ट्रेलिया पोलिसांनी खेदही व्यक्त केला आहे.