उमेद – वंचित मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा…

<<< सुरेश चव्हाण

ज्यांच्या पूर्वजांनीही कधी शाळा पाहिली नाही, पाटी-पेन्सिल हातात धरली नाही, अशा ‘भटक्या आणि विमुक्त’ समाजातील मुलांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचे काम अनंत झेंडे हा ध्येयवेडा तरुण नगर जिह्यातील श्रीगोंदा येथे करत आहेत. समाजाने दूर लोटलेल्या मुलांना शिक्षित व सुसंस्कारित करण्याचे ठरवून त्यांनी महामानव बाबा आमटे यांच्या प्रेरणेने व त्यांच्याच नावाने ट्रस्ट स्थापन केला.

अनंत झेंडे यांनी 2008 मध्ये श्रीगोंदा येथे ‘महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थे’ची स्थापना केली. या संस्थेला आजही शासनाचं अनुदान नसताना विमुक्त भटक्या मुलांसाठी संस्था निवासाची, शिक्षणाची, त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेऊन काम करत आहे. या संस्थेचे संस्थापक व चालक अनंत झेंडे स्वत एका विद्यालयात शिपाई म्हणून काम करतात.

घरची शेतीवाडी व आर्थिक स्थिती चांगली असताना आजही शाळेत नोकरी का, असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘वडिलोपार्जित इस्टेटीपेक्षा स्वत कमावून चरितार्थ चालवणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं.’ खरं तर त्यांच्या घराला एक सामाजिक वारसा लाभलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात झेंडे याच्या आजोबांनी भाग घेतला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबर त्यांचा विशेष स्नेह होता. घरात स्वत:बरोबरच इतरांचाही विचार करण्याचं वातावरण होतं. हे सगळं अनंत यांच्या अंतर्मनात झिरपत राहिलं.

एकदा अनंत नगरच्या गिरीश कुलकर्णी यांनी उभारलेल्या ‘स्नेहालय’ या संस्थेत गेले व तिथलं त्यांचं काम बघून ते आश्चर्यचकित झाले. त्यांना अशा कामाची आवड होतीच. त्यांची ही आवड ओळखून गिरीश कुलकर्णी यांनी त्यांच्या मनात नवीन आकांक्षांचे अंकुर रुजवले. अनंत सुट्टीच्या दिवशी ‘स्नेहालया’त जाऊ लागले. तिथे कशाप्रकारे काम चालते याचे धडे त्यांना मिळू लागले. कुलकर्णी यांनी त्यांना ‘आनंदवनच्या श्रमसंस्कार छावणी’च्या शिबिरासाठी आनंदवनला पाठवलं. तिथे गेल्यावर मात्र त्यांना आपण वेगळ्या जगात आल्याची जाणीव झाली.

बाबांचं कुष्ठरोग्यांबद्दलचं काम पाहून ते भारावून गेले. आपणही बाबांसारखं काम केलं पाहिजे व आपल्या संस्थेचं नाव ‘बाबा आमटें’च्या नावाने ठेवायचं असं त्यांना वाटू लागलं. आपल्या मनातले हे विचार त्यांनी विकास आमटेंना बोलून दाखवले. त्यावर ते म्हणाले, ‘हे काम वाटतं तितकं सोपं नाही. या मार्गात दुःख आणि वेदना यांचा सतत सामना करावा लागेल.’ अनंत यांची त्यासाठी तयारी होती, पण हे काम कसं करायचं याचं उत्तर त्यांच्याजवळ नव्हतं. त्यावेळेस त्यांचा पगारच मुळात तीन हजार रुपये एवढाच होता.

आनंदवनातून आल्यानंतर मात्र झपाटल्यासारखी अनेक कामं त्यांनी श्रीगोंदामध्ये सुरू केली. त्यांना ‘विद्यार्थी सहाय्यक समिती’चं काम उभारणाऱ्या अच्युतराव आपटे यांच्याप्रमाणे काम करायचं होतं. याच काळात त्यांना नगरमध्ये असलेले जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, विश्वास नांगरे-पाटील आणि पोलीस सुपरिटेंडेंट कृष्णप्रकाश यांच्या कामाने प्रेरित केलं. सरकारी योजना समजून घेणं व त्यांची अंमलबजावणी गावात करणं. मग ती ‘हागणदारीमुक्ती योजना’ असो किंवा ‘स्वच्छता अभियान’ असो… या सगळ्यात अनंत सहभागी होऊ लागले. एकट्यानेच हातात खराटा घेऊन गावातली गल्ल्या झाडू लागले.

सुरुवातीला लोक त्यांची चेष्टा करू लागले, हसू लागले. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं, आपल्या गावासाठी ते इतकं करतात, तर मग आपणही त्यांना मदत करायला हवी. त्यांच्या लाघवी स्वभावामुळे अनेक माणसं त्यांनी जोडली. त्यामध्ये स्वित्झर्लंड येथील डॉ. ऑस्कर या परदेशी मित्राने अनंत यांना आर्थिक मदत केली आणि गावात बोअरवेल व पाण्याची टाकी आली. यामुळे गावकऱ्यांची पाण्याची सोय झाली. नंतर अनंत यांना गावात प्रबोधनपर व्याख्यानमाला सुरू करावी, असं वाटू लागलं. त्यांनी कृष्णप्रकाश यांच्याशी संपर्क साधला आणि तीन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली. पण ते येऊ शकले नाहीत. जिथे दोन-तीन हजार लोक येतील अशी अपेक्षा होती, तिथे वीस-पंचवीस लोकही जमले नाहीत. निराश न होता अनंत पुन्हा कामाला लागले. कृष्णप्रकाश यांना पुन्हा व्याख्यानाला बोलावले, ते आले आणि तीन हजारांच्या वर लोक व्याख्यानाला जमले. त्यांचे व्याख्यान अतिशय उद्बोधक व प्रबोधनपर झाले. आजही अशा प्रकारची व्याख्यानमाला सुरू आहे.

परदेशी राहत असलेल्या मुंबईच्या गिरीश निळकंठ कुलकर्णी नावाच्या गृहस्थांना श्रीगोंदा येथील त्यांचा जुना वाडा सामाजिक कामासाठी द्यायचा आहे, असे समजल्यावर गिरीश कुलकर्णी व अनंत मुंबईला त्यांना भेटण्यास पोहोचले व वाडा त्यांच्या ताब्यात आला. अनंत यांनी स्वत वाड्याची साफसफाई व डागडुजी करून वाडा चांगल्या प्रकारे तयार केला. या वाड्यात गरजू विद्यार्थ्यांसाठी शंभर रुपये नाममात्र शुल्कावर त्यांनी वसतिगृह सुरू केलं. सुरुवातीला 30 मुलं आली. त्याचदरम्यान जवळच्याच भागातलं 40 मुलांचं वसतिगृह काही कारणांमुळे बंद होणार होतं. त्या वसतिगृहाच्या प्रमुखांनी गिरीश यांना फोन केला. त्यांनी अनंत यांच्याशी बोलून 40 मुलं त्यांच्या हाती सुपूर्द केली.

सुरुवातीला या मुलांच्या सवयी बदलण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. ती कुठेही घाण करत, कशीही राहत, पळून जात. अनंत हे त्यांना शोधून परत घेऊन यायचे. या मुलांची नावं खूप विचित्र होती. ‘कैदी’, ‘सतुऱ्या’, ‘पिस्तुल्या’ इत्यादी. अनंत यांनी गुन्हेगारीचा शिक्का बसलेली त्यांची नावं बदलली आणि त्यांचं कायदेशीर पालकत्व घेतलं. यादरम्यान त्यांना महिला बालकल्याण विभागातर्फे नोटीस आली. त्यांनी हे अनधिकृत काम ताबडतोब बंद करावं, असं सांगण्यात आलं. या मुलांना आधार दिला नाही तर ही मुलं गुन्हेगारीकडे वळतील हे सरकारला का कळत नाही? या विचाराने अनंत अस्वस्थ झाले. पण यातूनही मार्ग निघाला आणि त्यांना हे काम करण्याची रीतसर परवानगी मिळाली.

अनंत यांचं लग्न 2013 साली झालं. त्यांची पत्नी शुभांगी यादेखील त्यांच्या बरोबरीने काम करतात. या संस्थेत दाखल झालेली मुलं आज पदवीधर होऊन बाहेर पडत आहेत. एका पडक्या वाड्यात सुरू झालेली ही संस्था साडेचार एकरांच्या जागेत श्रीगोंदा येथील घुगलवडगाव येथे आता 140 पारधी, भटक्या व विमुक्त मुलांच्या राहण्याची व जेवणाची सोय करत आहे.

श्रीगोंदा इथल्या अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या दलित वस्तीत ‘साधना बालभवन’ व तेथूनच 15 किलोमीटरवरील काष्टी या गावात ‘आरंभ बालनिकेतन’ची स्थापना संस्थेने केली असून तिथे डोंबारी समाजाच्या मुलांसाठी ही संस्था काम करत आहे. लोकसहभाग व पुण्याच्या ‘देणे समाजाचे’ या संस्थेच्या मार्फत त्यांना आर्थिक मदत मिळाली आहे. एक तरुण विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन केवढं मोठं काम उभं करू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ध्येयवेड्या अनंत झेंडे यांचं कार्य!

[email protected]