कोरोना काळातही वाहन उद्योग जोरात, प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत यंदा लक्षणीय वाढ

park-car

कोरोना महामारीने सर्वच क्षेत्रांना मोठा झटका बसलेला असताना देशातील वाहन उत्पादन व्यवसायासाठी मात्र दिलासादायक माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या वाहन उत्पादकांच्या संघटनेने दिली आहे. गेल्या वर्षापेक्षा प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत यंदा 14.16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘सियाम’च्या डेटानुसार यंदाच्या ऑगस्टमध्ये 2 लाख 15 हजार 916 प्रवासी वाहने विकली गेली. गेल्या वर्षाच्या ऑगस्टमध्ये हीच संख्या 1 लाख 89 हजार 129 इतकी होती. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात पहिले 9 महिने वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवली होती. पण यंदा ऑगस्टमध्ये झालेल्या विक्रमी प्रवासी वाहने विक्रीने ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा दिलासाच मिळाला आहे.

गेल्या महिन्यात प्रवासी कारची विक्री 1 लाख 24 हजार 715 झाली, जी गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यातील 1 लाख 9 हजार 277 कार्सच्या तुलनेत 14.13 टक्क्यांनी जास्त आहे. शिवाय युटिलिटी वाहनांची यंदा ऑगस्टमधील विक्री 81 हजार 842 युनिट आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 70 हजार 837 युनिट होती. म्हणजेच यंदा युटिलिटी वाहनांच्या विक्रीतही 15.54 टक्के वाढ झाली आहे. प्रवासी व्हॅनची यंदा ऑगस्टमध्ये 9 हजार 359 अशी विक्री झालीय, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 9 हजार 15 वाहने अशी होती. दुचाकी म्हणजेच स्कूटर आणि बाईकच्या विक्रीनेही या ऑगस्टमध्ये 15 लाख 59 हजार 665 अशी मजल मारली आहे. गेल्या वर्षी हीच संख्या 15 लाख 14 हजार 196 होती अशी माहिती ‘सियाम’ने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या