
टाटा मोटर्सने मॅजिक एक्सप्रेस अँब्युलन्स हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. ही अँब्युलन्स खासकरुन इकॉनॉमी अँब्युलन्स सेगमेंटमध्ये आरोग्य सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डिझाइन केलेली आहे. ही अँब्युलन्स इतर अँब्युलन्सच्या तुलनेत आकाराने लहान आहे. ही अँब्युलन्स विशेषतः कोरोना संकटाला लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे.
टाटा मोटर्सच्या एससीव्ही अँड पीयू उत्पादनश्रेणीचे उपाध्यक्ष विनय पाठक म्हणाले, “मॅजिक एक्स्प्रेस अँब्युलन्स सर्वांपुढे आणून टाटा मोटर्स सर्वोत्तम आरोग्यसेवा वाहतूक सुविधा पुरवण्याचा आपला वायदा पूर्ण करत आहे. अशा वाहनांच्या आवश्यकता समजून घेण्यासाठी टाटा मोटर्स वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत काम करत होती आणि रुग्णाच्या वाहतुकीसाठी आवश्यक अशा सर्व गरजांची पूर्तता करणारे एक टेलर-मेड वाहन आम्ही सर्वांपुढे आणले आहे. या नवीन विभागात प्रवेश करून टाटा मोटर्सने अँब्युलन्स विभागातील उत्पादनांची श्रेणी अधिक विस्तारली आहे. यामध्ये परवडण्याजोग्या दरातील, खात्रीशीर आणि सर्व नियमांची पूर्तता करणाऱ्या रुग्णवाहिकांचा समावेश आहे.”
या अँब्युलन्समध्ये 800 सीसीचे टीसीआयसी इंजिन देण्यात आले आहे. जे 44 एचपीची पॉवर आणि 110 एनएमचा टॉर्क जनरेट करते. आकाराने लहान असल्याने ही अँब्युलन्स गर्दीच्या परिस्थितीत सहजपणे ऑपरेट केली जाऊस शकते. सोबतच रुग्णाला वेळेवर वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून दिली जाऊ शकते.




























































