जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या ‘अवनी’वर गोळ्या झाडल्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अवनी वाघिणीला मारले नाही, मारावे लागले, असे सांगणाऱया वन खात्याचे भांडाफोड झाले आहे. जीव वाचवण्यासाठी धावणाऱया अवनीवर मारेकऱयाने बेछूट गोळय़ा चालवल्या, असे धक्कादायक सत्य शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे स्वसंरक्षणाचा दावा करणारे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार सपशेल उताणी पडले आहेत.

यवतमाळमधील 13 जणांचे बळी घेतल्याचा आरोप करून वन खात्याने गेल्या शुक्रवारी रात्री अवनीला ठार मारले. या हत्याकांडानंतर राज्यातच नव्हे तर देशभरातील वन्यजीव प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. वन खात्याचा निषेध करणारे मोर्चे निघाले, निदर्शने झाली. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी तर वन मंत्री मुनगंटीवारांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. यावरून मनेका आणि मुनगंटीवार या भाजपच्याच दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.

मुनगंटीवारांचा दावा खोटा

अवनीला बेशुद्धीची गोळी मारण्यात आली होती; पण तिने वनरक्षकावर हल्ला केल्याने स्वसंरक्षणासाठी तिला ठार मारावे लागले, असा दावा मुनगंटीवार यांनी केला होता. अवनीचा शवविच्छेदन अहवाल उघड झाला असून मुनगंटीवारांच्या दाव्यातील हवाच निघाली आहे.

अहवाल काय म्हणतो…

चार पशुवैद्यकीय तज्ञांनी अवनीचे शवविच्छेदन केले आणि त्यांनी अहवाल दिला. अवनीच्या शरीरात घुसलेल्या गोळय़ांची दिशा पाहता ती जीव वाचवण्यासाठी दूर पळून जात असतानाच तिच्यावर गोळय़ा झाडण्यात आल्याचे दिसते, असे या अहवालात म्हटले आहे. शिवाय अवनीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी डार्टचा वापर करण्यात आला होता. तिच्या डाव्या पायाजवळ हा डार्ट आढळून आला. मात्र त्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.