अविनाश चव्हाण खून प्रकरण : १० जुलैला लातुरात शैक्षणिक बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभय मिरजकर । लातूर

स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसचे संचालक असलेले अविनाश चव्हाण यांची हत्या त्याच्याच सहकारी असलेल्या व्यक्तीने भाडोत्री गावगुंडाना सुपारी देऊन घडवून आणली त्यामूळे लातूर शहर व जिल्हा हादरुन गेला. या वृत्तीला आळा बसावा आणि असे प्रकार पुन्हा घडू नयेत, असे माथेफीरु भाडोत्री गुंडांना फाशीच देण्यात यावी आणि शैक्षणिक क्षेत्र विकासात्मकच असावे या धोरणातून माजी नगरसेवक रघुनाथ बनसोडे यांनी या प्रकरणी प्राथमिक चर्चा घडवून आणली होती. त्यानुसार लातूर येथील पत्रकार भवनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची व्यापक प्रा. दत्ता सोमवंशी यांच्या अध्यक्षेखाली बैठक घेण्यात आली आणि अविनाश चव्हाण हत्या प्रकारणाची सखोल चौकशी करावी, मारेकर्‍याना कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी १० जुलैला शैक्षणिक बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.

लातूर शहरातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस शहरातील वस्तीगृहे, अशा शैक्षणीक संस्था बंद ठेऊन निषेध नोंदवावा. तसेच वकील, डॉक्टर आणि प्राध्यापक-शिक्षकांनी बंदमध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्यासाठी तसे लेखी विनंती पत्र देण्याचे ठरले.समितीच्या प्रमूख कार्यकर्त्यांची बैठक ७ जुलैला होणार असून याच दिवशी १० जुलैला होणार्‍या शैक्षणिक बंदचे लेखी पत्र जिल्हाधिकारी लातूर आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना देण्यात येईल असे ठरले.

अविनाश चव्हाण यांची हत्या, तसेच शिक्षण क्षेत्रातील बेबंदशाही, कोंचिंग क्लासेसमधून होणारी शिक्षण क्षेत्रातील आर्थिक लूट त्याच बरोबर लातूर शहरातील शिक्षण संस्थांच्या शाळा व महाविद्यालयातील प्रवेश फी यामधून होणारी विद्यार्थ्याची लूट, तसेच शहरातील महाविद्यातयातील नाममात्र प्रवेशाखालील गल्लाभरूपणा, वैद्यकीय शिक्षणासाठी ३०/७० चे प्रवेशाचे निकश रद्द करणे, लातूर येथील मुला/मुलींचे तंत्रनिकेतन महाविद्यालय बंद करू नये, शासनाने स्वतंत्र अभियांत्रीक महाविद्यालय सुरू करावे, या व इतर मागणी संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस लातूर जिल्हा व शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते