अविनाश चव्हाण खून प्रकरण : पाच जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

खाजगी शिकवणी संचालक अविनाश चव्हाण यांच्या खून प्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्वांना पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अविनाश चव्हाण याची रविवार २३ जूनच्या मध्यरात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणी पोलिसांनी त्यांचा पूर्वीचा भागिदार प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा या मास्टर माईंडला अटक केली. त्यानेच २० लाखाची सुपारी दिली होती. भाजपा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा अंगरक्षक म्हणून काम केलेल्या किरण गहेरवार यानेच हा गेम केला. त्याच्या सोबत असणारा अक्षय शेंडगे, मध्यस्थ महेशचंद्र गोगडे (रेड्डी), शरद घुमे यांना अटक करण्यात आली. यावेळी पिस्तूल, जिवंत काडतुसे, २ लाख ३१ हजाराची रोख जप्त करण्यात आली. प्रारंभी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती मुदत मंगळवारी संपली म्हणून आज पाचही जणांना कडक पोलीस बंदोबस्तामध्ये न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना पुन्हा चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्यातून देण्यात आली.