COP26 – मोदी मिठीमुळे UN महासचिव बावरले, अवघड प्रसंग कॅमेऱ्याने टीपला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लास्गो इथे पार पडलेल्या 26 व्या जलवायू परिवर्तन (सीओपी) शिखर परिषदेला हजेरी लावली होती. पंतप्रधान मोदी हे अशा प्रकारच्या जागतिक संम्मेलनामध्ये आलेल्या राष्ट्राध्यक्षांची, पंतप्रधानांची गळाभेट घेत असतात. या नेत्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित व्हावे यासाठी त्यांनी अंगीकारलेली ही पद्धत आहे. मात्र त्यांच्या या पद्धतीमुळे एक अवघड प्रसंग घडला. जलवायू परिवर्तन (सीओपी) शिखर परिषदेदरम्यान घडलेला हा प्रसंग कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

स्कॉटलँडमधील ग्लास्गो येथे झालेल्या जलवायू परिवर्तन (सीओपी) शिखर परिषदेसाठी इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव अटोनिओ गुटेरस आले होते. हे दोघे मंचावर असताना हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही तिथे पोहोचले. पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीला जॉन्सन यांची भेट घेतली, मात्र त्यांना मोदींनी मिठी मारली नव्हती. यानंतर पंतप्रधान मोदींनी गुटेरस यांची भेट घेतली. गुटेरस यांना त्यांनी अचानक मिठी मारली, ज्यामुळे गुटेरस बावरले होते. त्यांची अवघडलेली अवस्था स्पष्टपणे दिसत होती.

बरं झालं मी मिठी मारली नाही! भाजप खासदार

पंतप्रधान मोदी यांनी या शिखर परिषदेला आलेल्या बोरीस जॉन्सन, लक्झेंबर्गचे पंतप्रधान झेविअर बेट्टेल, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची गळाभेट घेत त्यांच्यासोबत गप्पा मारल्या होत्या. पंतप्रधान मोदी हे ज्या पद्धतीने विविध देशांच्या प्रमुखांची भेट घेतात ते काहींना पसंत नाहीये. भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मिठी मारून लोकांची गाठभेट घेण्याच्या पद्धतीवरून खोचक टोमणा मारला आहे. स्वामी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा एक फोटो ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे. या फोटोवर स्वामी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की ‘बरं झालं, मी ओबामा यांना ओळखतो हे दाखवण्यासाठी मी त्यांना मिठी मारली नाही’

‘एक विश्व, एक सूर्य, एक ग्रीड’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सौर ऊर्जा स्वच्छ व टिकाऊ आहे. मात्र ती केवळ दिवसा उपलब्ध होते आणि हंगामावर अवलंबून असते हे आव्हान असून यावर मात करीत पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी जगाला ‘एक विश्व, एक सूर्य, एक ग्रीड’ हा मंत्र गरजेचा आहे, असे प्रतिपादन हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ग्लास्गोमध्ये 26 व्या जलवायू परिवर्तन (सीओपी) शिखर परिषदेत केले. तसेच सौर ऊर्जेची व्यवहार्यता वाढवण्यावर भर देत इतर देशांना एकात्मिक प्रयत्नांचे आवाहनही केले.

परिषदेत सौर ऊर्जेचे फायदे व यासंबंधी आव्हानांवर मात करण्याच्या विविध उपाययोजनांवर मते मांडण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदींनी सौर ऊर्जेच्या विश्वव्यापी ग्रीडवर भर दिला. विश्वव्यापी ग्रीडच्या माध्यमातून स्वच्छ ऊर्जा कुठेही आणि कधीही प्रवाहीत केली जाऊ शकते. प्रत्येक वस्तू सुर्यापासून निर्माण झाली आहे. सुर्य हा ऊर्जेचा एकमेव मूळ स्त्रोत आहे आणि सौर ऊर्जा सर्वांची गरज भागवू शकते, असे ते म्हणाले.

नैसर्गिक इंधनाने तणाव निर्माण केलाय!

नैसर्गिक इंधनाने औद्योगिक क्रांतीदरम्यान अनेक देशांना श्रीमंत बनण्यासाठी प्रेरीत केले. परंतु याने आपली पृथ्वी, आपले पर्यावरण खराब केले आहे. नैसर्गिक इंधन जमवण्याच्या स्पर्धेने देशादेशांमध्ये तणाव निर्माण केला आहे. परंतु तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीने आज सौर ऊर्जेच्या रुपात जगाला अत्यंत चांगला पर्याय दिला आहे. याचदरम्यान ‘एक विश्व, एक सूर्य, एक ग्रीड’ हा मंत्र विविध देशांमध्ये परस्पर सहकार्यासाठी नवा रस्ता खुला करेल, असा आशावादही मोदींनी व्यक्त केला.

पर्यावरण संतुलनासाठी पुन्हा सूर्यासोबत चालावे लागेल

जर आपल्याला निसर्गासोबत संतुलित जीवन जगायचे असेल, तर याचा रस्ता सुर्याच्याच सोबतीने प्रकाशमान होईल. मानवतेचे भविष्य वाचवण्यासाठी आपल्याला पुन्हा सूर्यासोबत चालावे लागेल. इस्त्राs लवकरच जगाला एक सौर ऊर्जा क@ल्क्युलेटर प्रदान करेल. या माध्यमातून जगभरात कुठल्याही क्षेत्राची सौर ऊर्जा मोजली जाऊ शकेल, असे मोदी म्हणाले.