फिक्सर अझरला ‘हा’ मान का? गौतमचा ‘गंभीर’ सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान-वेस्ट इंडीजदरम्यान कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रविवारी पहिला टी-20 क्रिकेट सामना झाला. सामन्याच्या आधी प्रथेप्रमाणे या स्टेडियमवरील घंटा वाजविण्याचा मान ‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला देण्यात आला. फिक्सिंगचा डाग असलेल्या अझरुद्दीनला दिलेला हा मान हिंदुस्थानचा सलामीचा फलंदाज गौतम गंभीरला रुचला नाही.

ट्विटरवरून नाराजी व्यक्त करताना गौतम गंभीर म्हणाला, पहिल्या सामन्यात मला एक गोष्ट खूपच खटकली. भ्रष्टाचारी लोकांबद्दल ‘बीसीसीआय’ची प्रशासकीय समिती, सीओए आणि बंगाल क्रिकेट संघटना यांची काही ठोस भूमिका दिसत नाही. अझरला ईडन गार्डन्सवर सामन्यापूर्वी घंटा वाजविण्याचा मान मिळणे हे खूपच धक्कादायक आहे.’

दिल्लीचे कर्णधारपद सोडले

गौतम गंभीरने सोमवारी दिल्लीच्या रणजी संघाचे कर्णधार पद सोडले. त्याच्या जागेवर नितीश राणाकडे आता संघाची धुरा सोपविण्यात आली आहे.