
सामना ऑनलाईन । इपोह (मलेशिया)
मनप्रीत सिंहच्या हॅटट्रिकच्या जोरावर हिंदुस्थानने बुधवारी सुल्तान अझलान शाह हॉकी स्पर्धेत कॅनडाचा 7-3 गोलफरकाने धुव्वा उडवला. चार लढतींत तिसरा विजय मिळवून हिंदुस्थानने अंतिम फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. दक्षिण कोरियाविरुद्ध हिंदुस्थानला बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. या विजयामुळे हिंदुस्थानचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.
मागील लढतीत यजमान मलेशियाला 4-2 गोलफरकाने हरविणाऱया हिंदुस्थानने कॅनडाविरुद्धही आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत सुरुवात केली. वरुण कुमारने 12व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून हिंदुस्थानचे खाते उघडले. लढतीतील दुसरा क्वॉर्टर गाजविला तो हिंदुस्थानच्या 24 वर्षीय मनप्रीत सिंह याने. त्याने 20 व्या मिनिटाला सुमित कुमारच्या पासवर सुरेख गोल करून हिंदुस्थानची आघाडी 2-0 ने वाढवली. मग कोथजित सिंगच्या पासवर मनप्रीतने कॅनडाच्या संरक्षण फळीला चकवा देत आणखी एक गोल केला. पुढच्या दोन मिनिटाला त्याने गोलची हॅटट्रिक करून आघाडी 4-0 अशी भरभक्कम केली.
तिसऱया क्वॉर्टरमध्ये मार्क पियरसनने 35व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून कॅनडाचे खाते उघडले, मात्र अमित रोहिदासने 39व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून हिंदुस्थानची आघाडी 5-1 ने वाढवली. त्यानंतर कॅनडाच्या फिन ब्रुथ्रोयाडने 50व्या मिनिटाला गोल करून 2-5 असे अंतर कमी केले. मग विवेक प्रसादने 56 व्या मिनिटाला भन्नाट मैदानी गोल करून हिंदुस्थानची आघाडी 6-2 अशी वाढवली, मात्र जेम्स वॅलेसने 57व्या मिनिटाला गोल करून कॅनडाची पिछाडी 3-5 अशी कमी केली. नीलकांत शर्माने 58 व्या मिनिटाला गोल केल्याने हिंदुस्थानने ही लढत रुबाबात जिंकली.
कोरियाने मलेशियाला हरवले, पण…
दक्षिण कोरियाने मलेशियाला 2-1 अशा फरकाने हरवले. मात्र गुणतालिकेत त्यांना पहिले स्थान कायम राखता आले नाही. हिंदुस्थान व दक्षिण कोरिया यांनी प्रत्येकी दहा गुणांची कमाई केली. पण सरस गोलफरकाच्या सरासरीनुसार हिंदुस्थानने पहिल्या स्थानावर झेप घेतली. दक्षिण कोरियाला दुसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. आता अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत हिंदुस्थान पोलंडला तर दक्षिण कोरिया जपानला भिडणार आहे.

























































