नायरमधील मूल देसाई रुग्णालयात सापडले ,महिलेला अटक

26

सामना ऑनलाईन, मुंबई

गुरुवारी सायंकाळी नायर रुग्णालयातून चोरीला गेलेले पाच दिवसांचे अर्भक अखेर सुखरूप सापडले. नायर रुग्णालयातून बाळ घेतल्यानंतर चोर महिलेने थेट सांताक्रुझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय गाठले. घरी प्रसूती झाल्याचे सागंत ती महिला तेथे दाखल झाली, पण रुग्णालयात तैनात असलेल्या एका अंमलदाराने त्या महिलेला ओळखले आणि बाळ सुखरूप सापडले.

दहिसर येथे राहणारी शीतल साळवी (34) ही महिला प्रसूतीसाठी नायर रुग्णालयातून दाखल झाली होती. 8 जून रोजी शीतल यांनी एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर बाळ आणि त्याची आई वॉर्ड क्रमांक 7 मध्ये दाखल होते. दरम्यान, गुरुवारी सांयकाळी शीतल यांना झोप लागली असताना हीच संधी साधत वसई येथे राहणारी हेजल डोनाल्ट कोरिया (37) या महिलेने कोणाचेही लक्ष नसताना बाळाला शिताफीने बॅगेत भरून पळ काढला होता.

मूल होत नव्हते म्हणून म्हणून बाळ चोरले

मला मूल होत नव्हते. वाडिया रुग्णालयात उपचारदेखील केले, पण त्याचा काहीच फायदा होत नव्हता. त्यामुळे नायरमधून ते बाळ चोरण्याचे हेजलने प्राथमिक तपासात सांगितले. मात्र हेजल खरे बोलते की बाळचोरी करणाऱ्या टोळीसाठी ती काम करते याचा आम्हाला आता तपास करायचा असल्याचे आग्रीपाडा पोलीसांचे म्हणणे आहे.

चार पथके, सीसीटीव्ही तपासणी, व्हॉटस्ऍपची मदत

नायर रुग्णालयातून पाच दिवसांचे अर्भक चोरीला गेल्याची तक्रार आल्यानंतर पोलिस निरीक्षक बागल, एपीआय नागेश पुराणिक, उपनिरीक्षक प्रमोद कुदळे, यासमिन मुल्ला यांच्यासह चार पथके तयार करण्यात आली. अर्भकाला चोरून महिला टॅक्सीतून जाताना स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्याबरोबर पोलिसांनी त्यांच्या व्हॉटस्ऍप ग्रूपवर अर्भक चोरणाऱ्या महिलेचा आणि बाळाचा फोटो व्हायरल केला. नेमका त्याचाच फायदा झाला.

पायावरच्या डागामुळे ओळख पटली

शीतल यांच्या बाळाच्या पायावर एक डाग आहे. आग्रीपाडा पोलीस मनलीच्या वडिलांना व्ही. एन. देसाई रुग्णालयात घेऊन गेले. तेव्हा मुलीच्या पायावर डाग असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्या पायावर डाग असल्याचे स्पष्ट झाले.

आपली प्रतिक्रिया द्या