
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या रुचि सोया कंपनीला खरेदी करण्यासाठी 3200 कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्याची माहिती योगगुरु बाबा रामदेव यांनी दिली. स्टेट बँक ऑफ इंडियातून 1200 कोटी, पंजाब नॅशनल बँकेतून 700 कोटी, युनियन बँकेतून 600 कोटी, सिंडिकेट बँकेतून 400 कोटी आणि इलाहाबाद बँकेतून 300 कोटी असे कर्ज रामदेव बाबांना मिळणार आहे. सप्टेंबरमध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) कर्जात बुडालेल्या रुचि सोयाच्या खरेदीसाठी पतंजलीची रेझोल्युशन योजना मंजुरी दिली होती. रुचि सोयाच्या खरेदीसाठी पतंजलीला कर्जाची जरुरत होती. पतंजलीचे व्यवस्थापन संचालक आचार्य बालकृष्ण यांनी आज सांगितले की, एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाने पतंजलीला आवश्यक ते कर्ज मिळाले आहे.



























































