बाबुजी : अलौकिकाचा अमृतस्पर्श

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sudhir-phadke

>> श्रीपाद द. सहस्रबुद्धे, ठाणे

पानोपानी मनसोक्त फुलून आलेलं पारिजाताचं झाड आपण अनेकदा पाहिलय. हा पारिजात आपल्या सुंदर सुकुमार फुलांचे बहर रसिकांवर मुक्तपणे उधळीत असतो आणि रसिकदेखील ती नाजुक सुंदर फुलं ओंजळीत घेऊन त्यांचा गंध तना-मनात साठवीत राहातात. मराठी भावगीत-चित्रगीतांच्या स्वरांगणात ‘सुधीर फडके’ नावाचा पारिजात पन्नासाहून अधिक वर्ष असाच मनमुराद बहरत राहिला. पारिजाताच्या तलम सुंदर फुलांसारखीच, आपल्या गोड, हळुवार आवाजातील गाणी आपल्या अगणित चहात्यांना पुन्हा पुन्हा देत राहिला. अलौकिकाचा स्वरस्पर्श लाभलेल्या त्याच्या गायनीकळेवर पिढ्यांमागून पिढ्या लुब्ध होऊन राहिल्या. त्यांच्या उत्कट, भावमधुर गाण्यावर रसिकांनी जिवापाड प्रेम केलं. त्यांचं गाणं त्यांनी हृदयाशी धरलं.

सुगम संगीताचं सुवर्णयुग

मराठी सुगम संगीताची वाटचाल पाहिल्यास – विसाव्या शतकाच्या आरंभी गंधर्वांची जादू निर्विवाद होती. त्यानंतर मास्तर कृष्णरावांचा जमाना गाजला. पुढे खऱ्या अर्थाने मराठी भावगीताचा उदय झाला तो जी. एन. जोशी, रानडे, गजानन वाटवे, बबनराव नावडीकर या मंडळींच्या काळात. साधारणपणे 1945 नंतरच्या सलग पन्नासाहून अधिक वर्षाच्या कालखंडावर मात्र लखलखीत सुभद्र मुद्रा होती ती सुधीर फडके यांचीच. फडकेयुग मराठी सुगम संगीताचं सुवर्ण युग होतं.

गायक आणि संगीतकार दोन्ही दृष्ट्या फडके श्रेष्ठ होते. गीताला चाल लावतांना आधीच्या रचनाकारांमध्ये विशेषत्वाने आढळणारा ‘नाटकी’ बाज त्यांनी आपल्या गाण्यातून जाणीवपूर्वक टाळला. निरनिराळ्या रागांचा त्यांनी मोठ्या खुबीने वापर केला. आपल्या स्वररचनांमध्ये विविधता ठेवली. बाबूजी (सुधीर फडके) प्रयोगशील होते.

संगीत रचनेचा त्यांचा विचार तत्कालिन संगीतकारांपेक्षा वेगळा होता. खरे तर त्यांचा विचार काळाच्या मानाने बराच पुढचा होता. समकालिन गायकांच्या गाण्यातील कृत्रिम नखरा त्यांना भावत नव्हता. बालगंधर्वाचे, मा.कृष्णरावांचे खोल संस्कार त्यांच्या गाण्यावर निश्चित होते. परंतू अगदी डोळसपणे त्यातील अवाजवी गोष्टी त्यांनी दूर ठेवल्या. लय-ताल-स्वर यांचं अचूक ज्ञान आणि त्याबरोबरच काव्याची सूक्ष्म अशी जाण असलेल्या या प्रतिभावंत संगीतकाराच्या हाती ‘ शब्दावली’ येताच त्याला सहजपणे ‘स्वरावली’ सुचू लागत. यक्ष-गंधर्वाची सिद्धी जणू त्या शब्द-शिल्पामध्ये प्राण फुंकित असत. काव्यातील पाने-प्रसंग मग सजीव होऊन बोलू लागत. श्रोते देखील भारल्यागत त्यातील भाव-भावनांशी एकरूप होऊन जात.

‘स्वराभिनय’

बाबुजींचे गाणे ऐकताना नेहमीच जाणवायचे ते त्यांचे गाण्यातील भावानुरूप, लय-तालाचे भान ठेवून योग्य आघात देत केलेले स्पष्ट, वैशिष्ट्यपूर्ण शब्दोच्चार! ज्यामुळे त्यांचे गाणे अतिशय परिणामकारक होत असे. श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत असे. राष्ट्रपतींचे पारितोषिक मिळालेल्या, त्यांचीच निर्मिती असलेल्या ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातील राजा परांजपे यांच्या तोंडी असलेलं ‘हा माझा मार्ग एकला’… हे गाणं आठवा. बाबूजींच्या स्वरांनी राजा परांजप्यांचा अभिनय बोलका झाला आहे. अभिनय हा मुख्यत्वे ‘कायिक’ किंवा ‘वाचिक’ असू शकतो. पण बाबूजींनी गाण्याच्या आपल्या वेगळ्या शैलीतून अभिनयाचे एक तिसरेच परिमाण आपल्याला प्रत्ययकारीपणे दाखविले -‘स्वराभिनय!’ त्यांच्या स्वरातून खरोखरच एक तरल अभिनय व्यक्त होत असे. उदाहरणच द्यायचे झाले तर पाडगावकरांची ही चार गाणी नजरेसमोर आणू. कधि बहर कधि शिशिर, अशी पाखरे येती, कुठे शोधिसी रामेश्वर आणि तुझे गीत गाण्यासाठी. गेल्या चाळीसाहून अधिक वर्षाच्या कालप्रवासानंतरही ह्या गाण्यांची मंतर-मोहिनी आजही तशीच टिकून आहे. पाडगावकरांचे शब्द सुंदरच आहेत. देवांच्या चाली देखील अप्रतिम आहेत पण गाण्यातील भावाची परिणामकारकता नेमकी साधली आहे बाबूजींच्या गोड आर्जवी स्वरांनी!

‘कधि बहर कधि शिशिर’ च्या रेकॉर्डिंगच्यावेळची अनुभूती खुद्द पाडगावकरांनीच सांगितली आहे. पाडगावकर म्हणतात- ”ह्या गाण्याचे शब्द तर माझेच होते. देवांनी दिलेली सुरेख अनुरूप चालही आता माझ्या माहितीची होती. परंतु बाबुजी ते गाणे गाऊ लागले आणि त्यांच्या गाण्यातून मला आजवर न जाणवलेला असा वेगळाच अर्थ प्रकट होत गेला. जणू माझंच गाणं मला नव्यानं भेटत होतं..” एखाद्या प्रतिभावान् चित्रकाराला जशा रेषांपलिकडच्या रेषा दिसू लागतात. मूर्तिकाराला जसे आपल्या असामान्य प्रतिभेने आकाराच्या पलिकडील आकार स्पष्ट होऊ लागतात, तसे बाबूजींना काव्यामधील अशया-पलिकडील आशय दिसू लागे आणि आपल्या गाण्यातून तो आशय श्रोत्यांच्या मनात झिरपत नेण्याची किमया त्यांच्या स्वरातून साधत असे.

चित्रपटकारकिर्द

पुलंनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कुंडलीतील हा एक विलक्षण भाग्ययोग होता. गदिमांच्या रुपाने एक असामान्य प्रतिभेचा शब्दप्रभू महाकवी तर सुधीर फडक्यांच्या रुपाने स्वर-ताल-लय यांचे अभिजात ज्ञान असलेला आणि गळ्यात अलौकिक स्वरमाधुरी घेऊन आलेला प्रतिभावंत गायक-संगीतकार – दोघेही एकाच कालखंडात ह्या महाराष्ट्रदेशी उदयाला आले. केवळ ईश्वरी योजना म्हणूनच की काय महाराष्ट्राच्या वाट्याला हे शब्द-स्वरांचं दान आलं. एकाहून एक सरस, चित्रदर्शी शैलीतील अर्थवाही गाणी अण्णा(गदिमा) रचित गेले, आणि त्यांना तशाच सुंदर भावपूर्ण चाली बाबूजी बांधीत गेले. अनेक चित्रपटातील या दोघांची गाणी कमालीची लोकप्रिय झाली. ‘प्रभात’ फिल्म कंपनीचे संगीतकार म्हणून बाबूजींचे नाव प्रथम झळकले ते ‘गोकुळ’ ह्या 1949 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात. पाठोपाठ 1947 सालांत ‘रुक्मिणी स्वयंवर’ व ‘आगे बढो’ आणि त्यानंतर 1948 सालात ‘जिवाचा सखा’ आणि ‘वन्दे मातरम्’ हे चित्रपट आले. त्यापैकी ‘वन्दे मातरम्’ हा चित्रपट काढला होता श्री. पु. रा. भिडे यांनी (हे भिडे म्हणजेच पुढे लोणावळ्याला ‘मन:शक्ती’ केन्द्राची स्थापना ज्यांनी केली ते स्वामी विज्ञानानंद) ह्या चित्रपटाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे यात नायक नायिकेच्या भूमिकेत पुल आणि सुनीताबाई
प्रथमच पडद्यावर दिसले. बाबूजींनी गायलेले ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मातरम्’ हे गाजलेले गाणे याच चित्रपटातील! अल्पकाळातच बाबूजींनी, मराठी चित्रपट संगीतात स्वत:च्या खास शैलीने आपले वेगळे स्थान निर्माण केले. 1950साली प्रदर्शित झालेल्या ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटात गदिमा, राजा परांजपे व सुधीर फडके ही पुढील काळात गाजलेली त्रिमूर्ती,
प्रथम एकत्र आली. उत्तम कथा-पटकथा, प्रासादिक, अर्थवाही गीतरचना गदिमा तयार करीत असत. सहज सुंदर प्रभावी
अभिनय आणि वास्तवदर्शी दिग्दर्शन राजा परांजप्यांचे असायचे आणि या चित्रपटासाठी अतिशय मधुर, सुश्राव्य अशी गाणी
बाबूजी संगीतबद्ध करायचे! एका मागून एक असे अनेक चित्रपट या तिघांनी महाराष्ट्राला दिले. हे चित्रपट प्रचंड गाजले. नावेच घ्यायची तर – ‘जशास तसे’, ‘उमज पडेल तर’, ‘लाखाची गोष्ट’, ‘प्रपंच’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘एकटी’… खरोखरच मराठी चित्रपटांचा तो सुवर्णकाळ होता. चित्रपटांच्या या यशामध्ये बाबूजींच्या कर्णमधुर संगीताचा वाटा तितकाच महत्वाचा होता. मराठीप्रमाणे हिंदीतही ‘सुधीर फडके’ या नावाकडे आदराने बघितले जाऊ लागले. ‘ज्योतिकलश झलके’ हे भूप रागातील लतादीदींनी गायलेलं बाबूजींचं गीत आजही वरच्या स्थानावर मानलं जातं.

अनिल विश्वास, खय्याम आदी बुजुर्ग संगीतकार आपल्याकाळातील एक अतिशय श्रेष्ठ संगीतकार म्हणून बाबूजींना मान देत. १९५४ साली प्रभातनेच काढलेल्या ‘पहली तारीख’ ह्या सिनेमातील, ”खुश है जमाना आज पहली तारीख है” हे किशोर कुमारने आपल्या ढंगदार शैलीत गायलेलं उडत्या ठेक्यातील गाणं आपल्या बाबूजींनी स्वरबद्ध केलेय हे आज अनेकांना ठावूक देखील नसेल; कमालीचे लोकप्रिय झालेले हे गाणें बिनाकावर ‘भूले बिसरे गीत’ कार्यक्रमात अगदी अलिकडेपर्यंत, दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अगदी न चुकता वाजविले जाई. जवळपास 85 मराठी आणि 21 हिन्दी चित्रपटांचे संगीत बाबूजींनी सजविले. मराठी चित्रपट सृष्टीत तर बाबीजी युगप्रवर्तक संगीत दिग्दशर्क ठरले.

गीत रामायण

‘गीत रामायण’ हा बाबूजींच्या संगीत कारकीर्दीचा कळसाध्यायच म्हणायला हवा. पुणे आकाशवाणीवरून 1956साली सादर केल्या गेलेल्या ह्या अद्वितीय संगीतिकेच्या वेळी सारेच योग जुळून आले. पुणे आकाशवाणी केन्द्रावरील अधिकारी सीताकांत लाड व श्री. कृ. द. दीक्षित यांची कल्पकता व कौशल्य, गदिमा व बाबूजींचं उत्स्फूर्त सहकार्य यातून ‘गीतरामायण’ साकारलं. दर आठवड्याला रामचरित्रातील प्रसंगावर आधारित एक गाणं अण्णा (गदिमा) लिहायचे आणि त्यांच्या त्या प्रासादिक शैलीतील गीताला तितकीच समर्पक चाल, लगोलग बाबूजी लावून द्यायचे लगेच ते गीत पुढील आठवड्यात तीन वेळा पुणे आकाशवाणीवरून प्रसृत केले जायचे. एक दोन नव्हे अशी छप्पन्न गाणी सलग सादर केली गेली. रामकथेतील एकेक प्रसंग अक्षरश: जिवंत होत गेला. श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत गेला. रामायणातील शांत, वीर, शृंगार, कोमल, करुण, विषाद, आनंद आदि अनेकविध रसातील गीतांना अगदी अनुरूप अशा चाली अगदी अल्पावधीत तयार करताना बाबूजींनी पिलू, यमन, पहाडी, बागेश्री, भूप, भैरवी, केदार या नेहमीच्या परिचित रागांबरोबरच सोहनी, मुलतानी, मांड इ. रागांचा मोठ्या कौशल्याने उपयोग केला. रामायण आकाशवाणीवरून सादर झालं तेव्हा मी अगदी लहान होतो. परंतू पुढे बाबूजींच्या तोंडून प्रत्यक्ष गीतरामायण ऐकण्याचे भाग्य मला लाभले आहे. ‘कुश-लव रामायण गाती’ या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी बाबूजी ‘श्रीराम’ असा रामनामाचा उच्चार सहा वेळ करीत. त्या त्यांच्या उच्चारणात विलक्षण सामर्थ्य असायचे. सारे श्रोते कानात प्राण आणून ऐकू लागत. मन अगदी शांत आणि प्रफुल्लित होई. अंगावर खरोखर रोमांच उभे रहात. हा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला आहे. 1958 साली पुण्याला नूमविच्या प्रांगणावर बाबूजींनी गीतरामायणाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. पुढे त्याचे देशात आणि देशाबाहेर जवळपास 2500 वर प्रयोग केले. गीतरामायणाने बाबूजींना अमाप लोकप्रियता, प्रसिद्धी मिळाली. द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना गीतरामायणाच्या संगीत दिग्दशर्नाबद्दल आणि सुरेल गाण्याबद्दल ‘स्वरश्री’ हा किताब दिला.

मनस्वी कलावंत- थोर माणूस

सुधीर फडके मनस्वी कलावंत होते. एक प्रतिभावान् गायक-संगीतकार म्हणून ते जसे श्रेष्ठ होते तसेच माणूस म्हणूनही ते थोर होते. त्यांच्या गाण्यातून जाणवणारी उत्कटता खरे तर त्यांच्या व्यक्तित्वाचाच स्थायी-भाव होती. सुरुवातीपासून अखेरपर्यंत त्यांचा जीवनप्रवाह स्वच्छ, पारदर्शी राहिला. बाबूजी आग्रही होते. क्वचितप्रसंगी त्यांचे राग-लोभ किंचित तीव्रही झाले असतील. परंतू ते सारे तात्कालिक असे. या सार्या पलिकडे एक अतिशय शांत, संवेदनशील, ऋजू, कलासक्त, प्रेमळ व निर्मळ मन होतं याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत त्यांचे तारुण्य घडत गेल्याने त्यांच्यावर राष्ट्रप्रेमाचे खोल संस्कार झाले होते. त्यांचं सावरकर प्रेम, त्यांची राष्ट्रभक्ती यात देखावा लवमात्र नव्हता. सावरकर चित्रपटाच्या निर्मितीचा तर त्यांनी ध्यास घेतला होता. या चित्रपटाच्या निर्मिती संबंधात अनेकांचे कटू शब्द, टीका, अवहेलना बाबूजींनी सहन केली पण सर्वसामान्यांच्या सहाय्यातून हा चित्रपट पूर्ण करण्याची आपली जिद्द सोडली नाही. वयाच्या ऐशींव्या वर्षीही हा थोर कलावंत चित्रपटाच्या युनिटबरोबर फिरत होता. अनेक अडचणींवर मात करून हा चित्रपट अखेरीस पूर्ण झाला याचे बाबूजींना खूप समाधान वाटले. ज्या ठिकाणी राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहिला, समाजाच्या स्वत्वाचा , स्वाभिमानाचा न्याय्य हक्काचा प्रश्न पुढे आला त्या ठिकाणी बाबूजींनी त्या चळवळीत त्या लढ्यात स्वत:ला झोकून दिले. मग तो गोवा मुक्ती संग्राम असेल, गोव्याचे स्वातंत्र्यवीर मोहन रानडे यांची पोर्तुगीज तुरुंगातून सुटका असेल किंवा ग्राहकाच्या न्याय्य हक्कासाठी उभारली गेलेली ग्राहक चळवळ असेल. बाबूजी त्यात हिरीरीने उतरले नव्हे अग्रेसर राहिले.

परावाणीतील स्वर

बाबूजींच्या गायनात शब्दांच्या उच्चाराची पराकोटीची शुद्धता होती. उच्चारलेला शब्द-स्वर तो तो भाव घेऊनच प्रकट होत
असे. परा, पशयंति, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत. पैकी ‘परा’ ही वाणी केवळ अंत:करणातून निघणारी आणि स्वरयंत्रातून बाहेर पडणारी वाणी नव्हे तर ती खोल नाभिकमलातून प्रकट होते. या वाणीत पराकाष्ठेची आर्तता, तनमन असते. ही वाणी खरोखर आत्म्याचीच धून असते. जे जे परावाणीतून प्रकट होते त्याला अमृतस्पर्श झालेला असतो. तो स्वर ऐकणार्याच्या अंतर्मनाची तार झंकारली जाते. बाबूजींचे परमस्नेही स्व. बिंदुमाधव जोशी (ग्राहक चळवळीचे प्रणेते) यांनी आपल्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे बाबूजींचे गाणे हे असे परेतून आलेले गाणे होते. त्या स्वरांचा उच्चार ही एक अंतर्बाह्य थरारून टाकणारी अनुभूति असे. आज बाबूजींना जाऊन अठरा वर्षे झाली. देहाने बाबूजी आपल्यात नसले तरी परावाणीतून आलेली त्यांची अगणित अजरामर गाणी आपल्यासोबत आहेत. पारिजाताच्या हळुवार, सुकोमल फुलासारखी ही गाणी बाबूजींच्या स्मृतीचा गंध पुढे कित्येक पिढ्यातून दरवळत ठेवणार आहेत कारण त्या स्वराला अलौकिक अमृतस्पर्श झाला आहे.