
जगभरात अनेक बाळं नऊ महिन्यांच्या आधीच जन्माला येतात. त्यातील सगळीच जिवंत राहत नाहीत. अमेरिकेत एक बाळ 21 व्या आठवडय़ात म्हणजेच पाचव्या महिन्यांतच जन्माला आले होते. जन्माच्या वेळी त्याचे वजन अवघे 420 ग्रॅम होते. हे बाळ आता 16 महिन्यांचे झाले असून सुदृढ आहे. ते ‘वर्ल्ड मोस्ट प्रीमॅच्युअर्ड बेबी टू सर्वायव्ह’ ठरले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तशी नोंद झाली आहे.
कर्टीस मीन असे बाळाचे नाव आहे. गेल्यावर्षी त्याचा जन्म अलबामा येथे झाला होता. कर्टीसच्या आईला पाचव्या महिन्यात जुळे झाले होते. म्हणजे सामान्य मुलांपेक्षा कर्टीसचा जन्म 19 आठवडे आधी झाला. जुळ्यांपैकी फक्त कर्टीस जिवंत राहिला. तो आज 16 महिन्यांचा आहे. त्याला अनेक महिने आयसीयूमध्ये ठेकण्यात आले होते. अजूनही त्याचा संघर्ष सुरू आहे. त्याला ऑक्सिजन आणि फीडिंग टय़ुबची गरज पडते.






























































