अमित शहांनी संसदेत मुर्खपणा केला, खोटं बोलण्याआधी विचार करायला हवा होता – बच्चू कडू

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवर बोलताना मारेगाव तालुक्यातील कलावती बांदूरकर या महिलेला मोदी सरकारने मदत केल्याचा दावा केला. मात्र त्यानंतर कलावती यांनी समोर येत अमित शहा खोटे बोलत असल्याचे सांगितले. यामुळे अमित शहांसह मोदी सरकारचेही बिंग फुटले आहे. त्यावरून अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. ”एवढ्या मोठ्य़ा नेत्याने संसदेत खोटं बोलताना विचार करायला हवा होता’, असं बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

अमित शहा यांनी संसदेत खोटा दावा केल्यानंतर कलावती बांदूरकर यांनी समोर येत त्यांचे बिंग फोडले. राहुल गांधी घरी आले आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्याला भरीव आर्थिक मदत केली. राहते घर आणि घरातील साहित्यही काँग्रेस काळातच मिळाल्याचे कलावती यांनी सांगितले. त्यावर प्रतिक्रीया देताना बच्चू कडू म्हणाले, ”अमित शाहांसारख्या मोठ्या नेत्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करण्याची गरज आहे. यामुळे भाजप अडचणीत येते”

”पहिल्यांदा राहुल गांधींनी कलावती यांना घर बांधून देत त्यांची विटंबना केली होती. हा मुर्खपणा केला होता त्यांनी. सामान्य लोकांचा छळ करण्यासारखं ते होतं. फक्त कलावती यांच्या घरी जाऊन वीज, घर द्यायचं, हे तर डिवचण्यासारखी पद्धत होती. करोडो लोक रांगेत उभी असताना एखाद्यासाठी उदार व्हायचं आणि बाकीच्यांच्या हाती भोपळा द्यायचा. आता त्यापेक्षा मोठा मुर्खपणा अमित शहांनी संसदेत केला. अमित शहांनी संसदेत कलावती यांना वीज, घर दिल्याचं सांगितलं. एवढ्या मोठ्या नेत्यानी खोटं बोलताना थोडं विचार करण्याची गरज होती. त्यामुळे भाजपा पक्षाच्या अडचणीत वाढ होते. प्रत्येक गोष्टीत हे खोटं बोलतात, असा प्रचार झाला आहे. विरोधकांना नवीन संधी अमित शाहांनी दिली आहे”, असे बच्चू कडू म्हणाले.