बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी राज्यातील वातावरण तापलेले आहे. अशातच अत्याचार झालेल्या दोन मुलींपैकी एका मुलीच्या कुटुंबातील सदस्याने शाळा प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलीला सायकल चालवल्यामुळे तिच्या गुप्तांगावर दुखापत झाली असेल असे सांगण्यास सुचविले व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असे पीडित मुलीच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले.
या घटनेची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांना दिली होती. मात्र त्यांनीही कोणतीच कारवाई केली नाही. याउलट मुख्यध्यापिका आणि शिक्षकांनी कुटुंबीयांचे आरोप फेटाळून लावत ही दुखापत शाळेबाहेर किंवा सायकल चालवत असताना घडली असावी, असे सांगितले. तसेच महिला पोलीस अधिकाऱ्याने शाळा व्यवस्थापनासोबत गुप्त बैठक घेत घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. वैद्यकीय पुरावे असूनही महिला पोलीस अधिकाऱ्याने कुटुंबाचे दावे फेटाळून लावले. अशी कोणतीही घटना घडली नसल्याने खोटी माहिती पसरवू नका, असे म्हणत धमकावल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
दोन्ही पीडित मुलींवर शाळेतील शौचालयात अत्याचार झाले असल्याने, मुलींच्या कुटुंबीयांनी मुलांना शौचालयात नेण्यासाठी महिला कर्मचारी का उपस्थित नव्हत्या? असा प्रश्न देखील केला आहे. त्याचबरोबर, पीडित मुलीच्या पालकांना पोलीस स्थानक आणि रुग्णालयात दोन्ही ठिकाणी बराच वेळ वाट पाहण्यास भाग पाडले गेले. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना धमकावत आंदोलनात सहभागी न होण्यास सांगितल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला. या आरोपांमुळे नवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बदलापूरमधील एका नामवंत शाळेत 12 – 13 ऑगस्ट रोजी सफाई कर्मचाऱ्याने 4 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यापैकी एका मुलीने तिला त्रास होत असल्याचे तिच्या पालकांना सांगितले. या मुलीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेले. वैद्यकीय अहवालात मुलीच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचे समजले. 16 ऑगस्ट रोजी कुटुंबीय अहवाल घेऊन शाळेत गेले, परंतु शाळेने सगळे आरोप फेटाळून लावले. याआधी ही एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे घटनेनंतर उघड झाले.
यानंतर मुलीचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याकरीता गेले. मात्र तेथे त्यांना तब्बल 11 तास बसवून ठेवण्यात आले. अखेर राजकीय हस्तक्षेपानंतर तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतरही पोलिसांनी एफआयआरमधील त्यांच्या वक्तव्यात अनेक बदल केल्याचे आरोप कुटुंबीयांनी केला आहे.