
कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांच्या 5 लाखांपर्यंतच्या ठेवी देण्यासाठी डीआयसीजीकडून 374.05 कोटी रुपयांची रक्कम बॅंकेस प्राप्त झाली असून या रकमेचे ठेवीदारांना वाटप सुरु करण्यात आले आहे. 10 मार्चपर्यंत 3 हजार 65 ठेवीदारांना 63.52 कोटींचे वाटप करण्यात आले आहे, उर्वरित वाटपाचे काम बॅंकेच्या स्तरावर सुरु असल्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर व अन्य सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सहकारमंत्री पाटील म्हणाले की, रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या तपासणीत कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत आर्थिक अनियमितता आढळून आली, त्यानंतर बॅंकेवर आर्थिक निर्बंध आणले. बॅंकेच्या अर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांची नियुक्ती केली, त्यांनी एकूण 20 दोषी व्यक्तींविरुद्ध 529.36 कोटी रुपये रकमेचे दोषारोपपत्र बजावले असून 20 दोषींपैकी विवेकानंद पाटील आणि अभिजित पाटील या दोघांच्या मालकीच्या 70 मालमत्ता जप्तीचे आदेश काढले आहेत. बॅंकेमार्फत कर्जवसुलीची कार्यवाही सुरु असून बोगस कर्ज घेतलेल्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सहकारमंत्री पाटील यांनी सांगितले.
यवतमाळ जिल्हा बॅंकेच्या पाटण शाखेतील तक्रारींची विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी सुरु
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पाटण शाखेतील तक्रारीबाबत जिल्हा विशेष लेखापरीक्षकांकडून चौकशी सुरु असून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सहकारमंत्री पाटील म्हणाले की, पाटण शाखेच्या व्यवस्थापकांनी 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यवहाराची सादर केलेली माहिती आणि प्रत्यक्षातील माहिती यामध्ये तफावत आढळल्याने बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पाटण शाखेला भेट देऊन अहवाल बॅंकेला सादर केला. या शाखेत अनियमितता आढळल्याचे अहवालात निदर्शनास आल्याने बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकांची बदली करण्यात आली तर जिल्हापरिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या पत्राच्या अनुषंगाने सखोल चौकशीचे आदेश दिले असून संबंधित शाखा व्यवस्थापकाला बॅंकेने निलंबित केले आहे, असे सहकारमंत्री पाटील यांनी उत्तरात नमूद केले आहे.






























































