होळी–रंगपंचमीवर मुंबईत बंदी, खासगी आणि सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिनाभरापासून झपाटय़ाने वाढणाऱया कोरोना रुग्णांमुळे अलर्ट झालेल्या पालिकेने मुंबईत होळी, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घातली आहे. गर्दी वाढू नये यासाठी सार्वजनिक आणि खासगी जागेत सार्वजनिकरीत्या उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी याबाबत आज आदेश जारी केले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट आली असतानाच होळीचा सण आल्याने गर्दी रोखण्यासाठी पालिकेने चार दिवस आधीच नियमावली जाहीर केली आहे. होळीदरम्यान नियम मोडणाऱयांवर नजर ठेवण्यासाठी पालिकेच्या पथकांकडून नजर ठेवली जाणार आहे. नियम मोडले गेल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

28 मार्च रोजी ‘होलिकोत्सव’ तर 29 मार्च रोजी ‘धुलिवंदन’ आणि ‘रंगपंचमी’ उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

टेन्शन! दादर मार्केटमधील सात फेरीवाल्यांना कोरोना

कोरोना रोखण्यासाठी पालिकेने रेल्वे स्टेशन, बस स्थानके आणि गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी अँटिजन चाचण्या वेगाने करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दादर स्थानकात फेरीवाले, खासगी सुरक्षारक्षक आणि सर्वसामान्यांच्या एकूण 68 चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 7 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.