
सामना ऑनलाईन, पणजी
मासे साठवून ठेवण्यासाठी फॉर्मेलिन या रसायनाचा वापर होत असल्याचे उघड झालं आहे. हा प्रकार गोवेकरांच्या आय़ुष्याशी खेळ असल्याने मत्स्यप्रेमी धास्तावले आहेत. या प्रश्नावरून गोव्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसायला लागल्याने मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बाहेरून येणाऱ्या माशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. पुढचे १५ दिवस इतर राज्यातून येणाऱ्या माशांवर बंदी घालत असल्याची घोषणा पर्रीकर यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांत गोव्यामध्ये फॉर्मेलिनमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. या व्हायरल बातम्यांमुळे गोवेकर धास्तावले आहेत. या बातम्यांमुळे अन्न आणि औषध प्रशासनाने मडगावच्या घाऊक मासळी बाजारावर धाड टाकली होती. इथे केलेल्या चाचण्यांमध्ये माशांमध्ये फॉर्मेलिन असल्याचे आढळून आले होतं. या धाडींमुळे संतापलेल्या मासळी विक्रेत्यांनी मडगाव,पणजी आणि म्हापसाचे बाजार बंद ठेवत आपला निषेध नोंदवला होता. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधीमंडळ गटाची मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत फॉर्मेलिनच्या विषयावरून सरकारला घेरण्याची रणनिती तयार करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे आणि काँग्रेसला आपल्याला अडचणीत आणण्याची संधी मिळून नये म्हणून पर्रीकरांनी इतर राज्यातून होणाऱ्या मासे आयातीवर बंदी घातल्याचं सांगितलं जात आहे. या बंदी मुळे गोवेकरांसाठी ऐन आषाढात श्रावण सुरु झाला आहे.



























































