
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा मोर्चाच्या वतीने आज ‘मातोश्री’वर मशाल मोर्चा काढण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची मागणी यावेळी करण्यात आली. परिवहनमंत्री अनिल परब यांनी भेटण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.
मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती, घटनापीठासमोर नेण्याचा विषय, मेगाभरती, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश आदी मुद्दय़ांवरून वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते ‘मातोश्री’ असा मशाल मोर्चा काढण्यात आला.
शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आंदोलकांनी मशाल हाती घेऊन ‘मातोश्री’कडे कूच करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ मोर्चा अडवला. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट होत नाही तोपर्यंत मैदानातच ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री भेटत नसतील तर राज्य सरकारच्या वतीने किमान परिवहनमंत्री अनिल परब यांनी तरी मोर्चेकऱयांची भेट घ्यावी अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली. तेव्हा पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील हे आंदोलनस्थळी आले. त्यांनी मोर्चेकऱयांशी चर्चा केली. आंदोलकांपैकी दहा प्रतिनिधींना अनिल परब हे जिल्हाधिकारी कार्यालयात भेटतील. त्यांना निवेदनही देता येईल, असे नांगरे-पाटील यांनी सांगितले. नांगर-पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आंदोलक शांत झाले. विनायक मेटे व इतर समन्वयकांनी अनिल परब यांची भेट घेण्यास मान्यता दिली.
दरम्यान, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना या समितीवरून तात्काळ हटविण्यात यावे त्यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी यावेळी केली. मात्र मेटे यांचे हे आंदोलन राजकीय असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली.



























































