वांद्रय़ातील पुनर्विकासात उदय सामंत यांची ‘ताकद’, मोहित कंबोज यांची दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे पूर्व येथील शास्त्रीनगर म्युनिसिपल व्यापारी सेवा संघ आणि परिश्रम सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासात मोक्याचा प्लॉट बळकावण्यासाठी मिंधे गटाचे मंत्री उदय सामंत आणि भाजपचे नेते मोहित कंबोज यांची प्रचंड दादागिरी सुरू असल्याचा आरोप झोपडपट्टीधारकांनी केला आहे. यातील व्यापारी सेवा संघावर विविध मार्गांनी दबाव टाकला जात आहे. शिवाय स्वतःचा बिल्डर घुसवण्यासाठी झोपडपट्टीवासीयांकडून जबरदस्तीने अॅग्रिमेंट करून घेतले जात आहे. त्यामुळे झोपडपट्टीधारकही प्रचंड संतापले असून आपली फसवणूक होत असल्याची व्यथा त्यांनी मांडली आहे.

वांद्रय़ातील शास्त्रीनगर म्युनिसिपल सेवा संघाच्या अखत्यारीत 63 गाळेधारक आहेत, तर परिश्रम सहकारी गृहनिर्माण संस्थेअंतर्गत 211 सदनिका आहेत. झोपडीधारक आणि व्यापारी यांच्या प्रत्येकी 3300 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे. यामध्ये झोपडपट्टीवासीय आणि गाळेधारक यांनी एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी 2004 मध्ये करारनामा करण्यात आला. यामध्ये झोपडपट्टीकासीयांसाठी दोन इमारती बांधून झाल्यानंतर काही जणांना पर्यायी जागा देण्यात आली. मात्र यानंतर पुढील पुनर्विकास रखडला. 2014 मध्ये संबंधित विकासकाचा मृत्यू झाल्याने प्रकल्प ठप्प झाल्यामुळे व्यापारी सेवा संघ आणि परिश्रम संस्थेकडून एकत्रितपणे ‘एसआरए’कडे पुनर्विकासाठी पाठपुरावा करण्यात आला. यामध्ये पुनर्विकास रखडल्याने ‘आरएनए’ बिल्डरवर एसआरए नियम 13/2 अंतर्गत बाद ठरवण्याची कारवाई करण्यात झाल्यानंतर व्यापारी सेवा संघाच्या पुनर्विकासासाठी कर्पूर बिल्डरची व्यापाऱयांच्या बहुमताने नेमणूक करण्यात आली. यामध्ये 80 चौरस फुटांची जागा असणाऱया गाळेधारकांना 180 चौरस फुटांचे गाळे सेल इमारतीत मिळणार आहेत. मात्र आता या पुनर्विकासात मिंधे गटाचे उदय सामंत आणि भाजपच्या मोहित कंबोज यांनी खोडा घालण्यास सुरुवात केली आहे, असे रहिवाशांनी सांगितले. रहिवासी आणि गाळेधारकांवर प्रचंड दबाव आणला जात असून व्यापारी सेवा संघाच्या पुनर्विकासात मिळणारा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

बिल्डर निश्चित असताना पुन्हा निवडणुकीची नोटीस

‘आरएनए’ बिल्डरला एक वर्षाची मुदत देऊनही कोणतीही कार्यवाही केली नसल्याने त्याला हाय पॉवर कमिटीने काढल्यामुळे व्यापारी संघाने बहुमताने कर्पूर बिल्डरची निवड केली. असे असताना आता ‘एसआरए’कडून परिश्रम संस्थेला निवडणुकीसाठी पाठवण्यात आलेल्या पत्रात व्यापारी सेवा संघालाही उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचा आरोप चेअरमन शेख एम. के. आणि सेक्रेटरी सुरेश गावडे यांनी केला आहे.

असे सुरू आहे कारस्थान

– नवा बिल्डर नेमण्यासाठी 11 जानेवारी रोजी टेंडर प्रक्रियेत तीन बिल्डरचा समावेश असलेली सभा सत्ताधाऱयांच्या दबावाखाली निर्णय न घेता जाणीवपूर्कक गुंडाळण्यात आली. यानंतर महादेव कन्स्ट्रक्शनला टेंडर प्रक्रियेत बेकायदेशीरपणे इंट्री देऊन पुन्हा 30 एप्रिल रोजी बिल्डर निवडणुकीसाठी ‘एसआरए’कडून निर्देश देण्यात आले आहेत.
– विशेष म्हणजे बिल्डर अद्याप निवडला गेला नसताना झोपडपट्टी धारकांकडून ‘महादेव’ कन्स्ट्रक्शनकडून बेकायदेशीरपणे करारनामे करून घेतले जात आहेत. धक्कादायक प्रकार म्हणजे मोहित कंबोज यांच्या संबंधित ‘महादेव’ कंपनीचे रजिस्ट्रेशनही नाही. शिवाय संबंधित कंपनीने याआधी कोणतेही बांधकाम केलेले नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

बिल्डर निवडण्यासाठी निवडणूक झाली नसताना रहिवाशाच्या जबरदस्तीने सह्या घेण्याचा प्रकार सुरू आहे. कोणतीही माहिती न देता दमदाटी करून फसवणूक करून सह्या घेतल्या जात आहेत.
– छबुबाई बोऱ्हाडे, रहिवासी

बिल्डरकडून मनमानी सुरू असताना कमिटीकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. कमिटी मेंबर जादा घरे बळकावण्याचा प्रकार सुरू आहेत. नातेकाईकांच्या नावे घरे बळकाकली जात आहेत.
– सुनंदा मगर, रहिवासी

मी मूळ झोपडपट्टीधारक असताना मला अपात्र ठरवण्यात आले. तर एक-दोन घरांच्या जागेत चार ते सहा घरे बसवण्याचे प्रकार सुरू आहेत.
– गौतम  बोऱ्हाडे, रहिवासी