
टोळीचे वर्चस्व कमी होत असल्याने दहशत निर्माण करण्यासाठी एकावर खुनी हल्ला करून मोक्का गुन्ह्यात तब्बल 15 महिन्यांपासून फरार झालेल्या कुख्यात बंडू आंदेकर टोळीतील सराईताला खडक पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याविरूद्ध फरासखाना व समर्थ पोलीस ठाण्यातंर्गत खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत असे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. कुणाल सोमनाथ रावळ (वय 26, रा.नाना पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी सुर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर आणि त्याच्या 14 साथीदारांविरूद्ध 2021 मध्ये मोक्कानुसार दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तेव्हापासून गुन्हयामधील आरोपी कुणाल रावळ हा सव्वा वर्षांपासून फरार होता. याप्रकरणी एसीपी सतिश गोवेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी तपास पथकाला मार्गदर्शन करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पोलीस अंमलदार महेश जाधव आणि अक्षयकुमार वाबळे यांना रावळ याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला जेरबंद केले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक, राजेश तटकरे, एपीआय राकेश जाधव, उपनिरीक्षक राहुल खंडाळे, अजीज बेग, संदिप तळेकर, महेश जाधव, अक्षयकुमार वाबळे, विशाल जाधव, सागर घाडगे, राहुल शिंगे, मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, लखन ढावरे नितीन जाधव, महेश पवार यांनी केली.
…म्हणून केला होता जीवघेणा हल्ला
आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत असल्याच्या रागातून आरोपी कुणाल रावळ याने 21 फेब्रुरवारी 2021 फिर्यादी ओंकार गजाजन कुडले आणि मित्र सुरज ठोंबरे यांच्यावर हत्याराने वार करून जीवघेणा हल्ला केला होता. टोळीचा म्होरक्या बंडु आंदेकर याच्या चिथावणीवरून गुंड ऋषभ आंदेकर, दानिश शेख, हितेंद्र यादव, योगेश डोंगरे, विक्रम शितोळे, अक्षय अकोलकर, स्वराज्य वाडेकर, प्रतिक शिंदे, यश चव्हाण, देविदास गालफाडे, वैभव शहापुरकर, ऋषीकेश कांबळे, नंदकुमार नाईक, गणेश ऊर्फ गाडी गन्या अशोक वड्ड, कुणाल रावळ यांनी तरूणावर हल्ला केला होता.


























































