आज जागतिक इडली दिन; बंगळुरू सर्वात जास्त इडली खाते!

सामना ऑनलाईन । मुंबई

पिझ्झा, बर्गर्स सारख्या फास्ट फुडच्या जमान्यात हिंदुस्थानींनी मात्र, पारंपरिक इडलीलाच जवळ केले आहे. सकाळ असो, वा दुपार, संध्याकाळ असो की, रात्र हिंदुस्थानींच्या जिभेवर फक्त पारंपरिक इडलीची चव रेंगाळत असते. देशात बंगळुरू शहर इडलीचा फडशा पाडण्यात आघाडीवर आहे. ‘स्विगी’ या ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरवणाऱया ऍपने जागतिक इडली दिनानिमित्त (30 मार्च) केलेल्या ‘स्टॅट ईट स्टिक्स’ रिपोर्टमध्ये इडलीची ही खाद्य कर्तबगारी समोर आली आहे.

मूळची दाक्षिणात्य असलेली इडली आता हिंदुस्थानची राष्ट्रीय न्याहारी झाली आहे. पंचतारांकित हॉटेल्सच्या बुफे मेनूपासून ते रिक्षाचा भोंपू एका हाताने वाजवत डोक्यावर इडलीचे भांडे व चटणी-सांबार घेऊन रस्त्याने फिरणाऱया फेरीवाल्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी इडली या पदार्थाची एक सवयच हिंदुस्थानीयांना लागली आहे. आता तर जगभरातील हॉटेल्समध्ये इडलीने मानाचे स्थान पटकावले आहे.

‘स्विगी’च्या रिपोर्टनुसार, 2018 मध्ये ज्या पदार्थांना न्याहारीसाठी सर्वाधिक मागणी होती, त्या इडलीचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. साध्या इडलीपासून ते रवा इडली, घी पोडी इडली, थत्ते इडली, बटर इडली, तवा इडली, गुंटूर इडली असे असंख्य प्रकार हिंदुस्थानींनी लोकप्रिय केले आहेत.

  • बंगलोर हे हिंदुस्थानातील इडली राजधानी आहे. सर्वाधिक इडलीच्या ऑर्डर याच शहरात दिल्या जातात.
  • हैदराबाद आणि चेन्नईकर हे बंगलोरपाठोपाठ इडलीला सर्वाधिक पसंती देतात.
  • मूळची दक्षिण भारतीय असली तरी पुण्यापासून गुरुग्रामपर्यंत आणि मुंबईपासून कोलकात्यापर्यंत इडलीने सर्वच खवय्यांच्या पोटात आणि जिभेवर आपले अधिराज्य अबाधित ठेवले आहे.
  • न्याहारीखेरीज रात्री उशिरा जेवणाऱयांमध्येही इडली तितकीच लोकप्रिय आहे.
  • स्विगीची ऑर्डर देणाऱयांमध्ये ठरवून इडली मागवणाऱयांची संख्याही खूप मोठी आहे.