
कधी तुमच्या खात्यात अचानक लाखो रुपये आले तर तुमची मनस्थिती काय होईल? तुम्हाला या पैशांचं काय करू असा प्रश्न नक्की पडेल. पण, जर कधी असं झालं तर नेमकं काय केलं पाहिजे, ते माहीत असणं गरजेचं आहे.
जर तुमच्या खात्यात कोणत्याही संदर्भाशिवाय लाखो रुपये आले असतील तर तुम्हाला हा सावधानतेचा इशारा आहे. काही जण हे पैसे खर्च करतात. पण, हे पैसे खर्च करू नयेत. यातल्या एकाही रुपयावर आपला हक्क नसतो. अनेकदा तांत्रिक गडबडीमुळे किंवा मानवी चुकांमुळे अशा प्रकारे खात्यात अचानक मोठी रक्कम जमा होऊ शकते.
पण, ते खात्यात जमा झाले म्हणून खातेदाराचे पैसे नसतात. अशा प्रकारे जर चुकून पैसे जमा झाले तर त्वरित संबंधित बँकेच्या शाखेत तक्रार करा. जुनी देणी, कोणत्याही ठेवींची मुदत संपणे किंवा अन्यत्र कोणत्याही मार्गाने तुम्हाला पैसे जमा होणार आहेत का याची आधी खात्री करा. जर असे कोणतेही पैसे जमा होणार नसतील. तर तुमच्या खात्यात चुकून ही रक्कम जमा झाली आहे, असा त्याचा निष्कर्ष होतो. हे पैसे परस्पर काढून खर्च केल्यास तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकता.
कधी कधी बँकेच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे किंवा तांत्रिक कारणाने अशी रक्कम जमा होते. पण, बँकेच्या नित्य व्यवहारांमध्ये ती बाब लपून राहत नाही आणि बँक थोड्याच वेळात ती रक्कम मूळ जागी परत पाठवते. पण, त्या वेळात जर तुम्ही ती रक्कम खर्च केलीत किंवा काढलीत तर तुमच्याकडून ती परत मागण्याचा कायदेशीर अधिकार बँकेकडे असतो.
काही काळापूर्वी एका व्यक्तिला त्यांच्या जनधन खात्यात अचानक 15 लाख रुपये जमा झाल्याचं आढळलं. 2014मधील भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील 15 लाख रुपयांचा उल्लेख होता. खात्यात आलेली रक्कम हे तेच 15 लाख असावेत असा त्यांचा समज झाला. त्यांनी खात्यातून 9 लाख रुपये काढले आणि घर बांधण्याच्या कामात खर्च केले. आता बँक त्यांच्याकडे ही रक्कम परत मागत आहे.




























































