पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत बार मालकाने केला पत्निचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना ऑनलाईन । कोपरखैरणे

नवी मुंबईतील एका ३८ वर्षीय बार मालकाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला जिवे मारून टाकल्याची घटना समोर आली आहे. कोपरखैरणे येथे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या धर्मा गौडा याने पत्नी रेखाच्या(३२) डोक्यात लोखंडी रॉड घालून तिची हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. पत्नीच्या हत्येनंतर गौडाने फ्लॅटला कुलूप लावून तिथून पळ काढला.

कोपरखैरणे येथे एका फ्लॅटमध्ये धर्मा गौडा हा त्याची पत्नी रेखा, १० वर्षाचा मुलगा आणि चार वर्षाची मुलगी यांच्यासोबत राहत होता. रेखा १२ वर्षांपूर्वी त्याच्या बारमध्ये वेटर म्हणून काम करायची. त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत लग्न केलं. धर्मा गौडा याचा बार व्यवसाय जोरात सुरू होता. उल्हासनगरमध्ये त्याच्या मालकीचा एक बार असून महापे आणि जुहू गाव येथे त्याचे दोन लॉज आहेत.

पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर त्यांना दुपारी ४च्या दरम्यान एक अनोळखी कॉल आला. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांना दाराला कुलूप आढळल्याने त्यांनी चावीवाल्याला बोलवून घरात प्रवेश केला. घरात पत्नी रक्ताने माखलेल्या स्थितीत दिसली आणि तिच्याजवळ लोखंडी रॉडही आढळला. ज्यावर रक्ताचे डाग होते. पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी सांगितले की गौडाने त्याच्या मित्रासमोर आपला गुन्हा जाहीर केला जो पोलिसांचा खबऱ्या होता. त्यानंतर पोलीस खबऱ्याच्या मदतीने गौडाला अटक करण्यात आली.