शीरखुर्मा खायला नेले आणि तरुणाचे शीर कलम केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

बहिणीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या एका मुस्लिम तरुणाला समजावून सांगणाऱ्या भावाचाच त्या तरूणाने खून केल्याची घटना उघड झाली आहे. रमजान ईदच्या दिवशी शीरखुर्मा खायला जाऊया, असा बहाणा करून धारदार शस्त्राने तरुणाचे शीर धडावेगळे करण्यात आले तसेच त्याचे लिंगही कापण्यात आले. थंड डोक्याने निर्घृण खून करून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या माथेफिरूला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळी पडलेल्या टी शर्टवरून पोलिसांनी शिर नसतानाही या गुन्ह्याची उकल केली.

उमेश भीमराव इंगळे (वय २०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, मूळ रा. फलटण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी निजाम आसगर हाश्मी (वय १८, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे. हाश्मीला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली.

उमेशच्या मावस बहीणीशी निजामचे प्रेम संबंध होते. त्यावरून उमेशने निजामला समजावले होते. मात्र आपल्या प्रेमात अडथळा आणणाऱ्या उमेशचा राग निजामला होता. ईदच्या दिवशी (दि. १६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास उमेशला शीरखुर्मा खायला जाऊ, असे सांगत निजामने कोंढवा बुद्रूक येथे खडी मशीन चौक ते मंतरवाडी या रस्त्यावरील बालाजी हॉटेलमागे नेले. तेथे गेल्यावर निजामने पाठीमागून त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्याचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर त्याचा मृतदेह फरफटत नेऊन एका खड्ड्यात टाकला. या घटनास्थळी ‘रामराजे निंबाळकर २०१७ श्री एस के ग्रुप फलटण’ असे लिहिलेला रक्ताने माखलेला टी-शर्ट सापडला. त्यावरून कोंढवा पोलिसांनी तपास सुरू केला.

कोंढवा पोलिसांचे एक पथक फलटण येथे गेले. त्याचदरम्यान बिबवेवाडी येथे एक तरुण हरवला असल्याची तक्रार १८ जून रोजी दाखल झाली होती. खून झालेला तरुण हाच असल्याचा संशय पोलिसांना आला. त्याच्या कुटुंबियांनीही खून झालेला मृतदेह उमेशचाच असल्याचे स्पष्ट केले. ईदच्या दिवशी उमेशला निजाम सोबत पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार निजामला ताब्यात घेवून पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी सांगितले. उपनिरीक्षक संतोष शिंदे, पालांडे, कर्मचारी राजस शेख, सचिन शिंदे, संभाजी नाईक, पृथ्वीराज पलांडे, योगेश कुंभार, संजू कळंबे, गणेश गायकवाड, रिकी भिसे, आदर्श चव्हाण, अजमी शेख, दीपक क्षीरसागर यांनी ही कारवाई केली.

उमेशचा झाला होता साखरपुडा
एप्रिलमध्ये उमेशचा नात्यातील मुलीसोबत साखरपुडा झाला होता. लवकरच त्याचे लग्न होणार होते. तो महिन्याभरापूर्वी पुण्यात राहायला आला होता. त्याचा खून झाल्याने इंगळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा विरोध
उमेशचे शीर आणि लिंग कापून फेकल्याने नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्याचे अवयव सापडल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यावरून ससूनमध्ये गोंधळही झाला. याबाबत पोलीस आयुक्तांना मातंग समाज संघटनेने निवेदन दिले आहे.