
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी भरसभेत एका कामगाराच्या कानशिलात लगावल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी झालेल्या घटनेनचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या घटनेची बार्शीत जोरदार चर्चा सुरू आहे.
बार्शी शहरातील एका क्रिकेट सामन्याच्या समारोपाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमादरम्यान एक तरुण व्यासपीठावर गेला. तो आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाया पडत असताना त्याला दारू प्यायल्याचा जाब विचारत भरसभेत कानशिलात लगावली. यामुळे एकच खळबळ उडाली.
काही कार्यकर्ते त्याला घेऊन गेल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे काहीजणांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित तरुण राऊत बंधूंच्या खडी मशीनवर कामास आहे. वडिलकीच्या नात्याने नशेतील तरुणाला चापट मारल्याचा खुलासा आमदार राऊत यांनी केला आहे.


























































