BCCIच्या रेफ्रीवर महिलेचा बलात्काराचा आरोप, अटकेच्या भीतीने रेफ्री फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलाला क्रिकेटमध्ये उज्ज्वल भविष्य मिळवून देण्याच्या आमिषाने एका क्रिकेट रेफ्रीने महिलेवर बलात्कार केल्याचं वृत्त आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका रेफ्रीवर हा आरोप करण्यात आला आहे.

ही घटना दिल्लीनजीकच्या गाजियाबाद इथली आहे. या प्रकरणात वरुण कुमार नावाच्या एका रेफ्रीवर बलात्काराचा आरोप आहे. वरुण कुमार हा इंदरापुरम येथील रहिवासी असून तो बीएसएनएलमध्ये वरिष्ठ क्रीडा अधिकारी पदावर काम करतो. त्याने दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनमध्ये अंडर 14 निवडसमितीचं अध्यक्षपदही सांभाळलं आहे. तो स्वतः रणजी खेळलेला क्रिकेटपटू आहे आणि सध्या सामन्यात पंचाचं काम करतो.

पीडित महिलेने वरुणवर बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. पीडिता गाजियाबाद येथे राहते. तिचा मुलगा क्रिकेट खेळतो. तीन ऑगस्ट रोजी ही महिला त्याची फाईल घेण्यासाठी वरुण कुमारच्या इमारतीत गेली होती. तिथे वरुणने तिला घरी बोलावलं आणि शीतपेयातून गुंगीचं औषध पाजलं. त्यानंतर महिला बेशुद्ध पडल्याचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर तिला शुद्ध आली तेव्हा त्याने तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. महिलेने या प्रकरणी इंदिरापुरम येथे वरुण कुमारविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर वरुण कुमार फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.