निसर्गाचा सौंदर्याविष्कार गगनबावडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गाने मुक्तहस्त केलेली उधळण… बाराही महिने हिरव्यागार पाना–फुलांनी नटलेले डोंगर… त्यातून जाणारे दोन घाटरस्ते… पावसाळ्यात घाटातील कडेकपारीतून वाहणारे धबधबे असे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱया गगनबावडय़ाचे सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालते. इथल्या निसर्ग अविष्काराचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधांमुळे येथील धबधबे यंदाही पर्यटकांविना सुने–सुने झाले आहेत.

समुद्रसपाटीपासून पंचवीसशे फूट उंचीवर असलेल्या गगनबावडय़ाला निसर्गसौंदर्याचे भरभरून वरदान लाभले आहे. सांगशी येथे पाचव्या शतकातील राजा मंगलेश या चालुक्यकालीन राजाने स्थापिलेली ग्रॅनाईटच्या दगडात कोरलेली शीला आहे. त्यावर ब्राह्मी लिपीत अक्षरे कोरलेली आहेत. हा शिलालेख म्हणजे आपल्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ केलेले ‘जगातील पहिले स्मारक’ असून एक  अजरामर प्रेम कहाणी आहे. भोजराजाने बांधलेला व शिवरायांनी 1660 साली जिंकलेला ‘गगनगड किल्ला’ येथेच आहे. याच गडावर विश्ववंदित गगनगिरी महाराज 1935मध्ये वास्तव्यास आले होते. याशिवाय ऐनारीची लेणी, पळसंबे येथील एक पाषाणी मंदिर (पांडवकालीन लेणी) आहेत. ज्वलंत इतिहासाचा साक्षीदार व अध्यात्मिक पिठाचा वारसदार असलेला गगनबावडा पर्यटकांना आकर्षित करतो.