बीडची सीताफळे कोलकत्याकडे रवाना, मिळाला दमदार भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>उदय जोशी । बीड

बीड जिल्ह्याच्या मध्यम प्रतीच्या जमिनीत फुलवलेल्या सीताफळाच्या बागेने शेतकऱ्याची मानसिकताच बदलून टाकली आहे. म्हणूनच फळबाग लागवड वाढत आहे, थंडी पडताच अत्यंत देखणे आणि चवीला अवीट असणाऱ्या सीताफळाचा पहिला टप्पा कोलकत्याकडे रवाना झाला. 127 रुपये किलोचा भाव पदरात टाकून सीताफळे कोलकत्याकडे रवाना झाली आहेत. रत्न सुंदर सीताफळाचे यंदा 70 टन उत्पादन निघण्याची शक्यता असल्याचे उत्पादक धर्यशील सोळुंके यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील धर्यशील सोळुंके या प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक आणि नगदी पिकांना फाटा देत सीताफळाची बाग उभारली. एरव्ही बालाघाट डोंगररांगेत कोठे ही सहज उपलब्ध होणारे हे फळ कधीच भाव खाऊन गेले नाही. मात्र काडीवडगाव येथील शेतात सोळुंके यांनी 10 एकरवर गोल्डन जातीच्या वाणाची लागवड केली, स्वतः कृषी पदवीधर असणारे धर्यशील सोळुंके यांनी परिश्रम पूर्वक 3 वर्ष बाग जोपासली, आणि या परिश्रमाला अखेर फळ लागले , गत वर्षी पुणे, मुंबई, दिल्लीच्या बाजारात व्यापारातून मोठा नफा पदरात पाडून घेतल्या नंतर यंदा सीताफळ कोलकात्याच्या बाजारात विक्री साठी पाठवले आहे. बीडच्या सीताफळाने फळांच्या बाजारात दबंगगिरी दाखवली, किलो मागे तब्बल 127 रु. चा भाव मिळाला आहे, या हंगामात 70 टन सीताफळाचे उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे, संपूर्ण खर्च जाता 75 लाख रुपये निव्वळ नफा पदरात पडणार आहे. हा मिळणारा नफा इतर कोणत्याही पिकापेक्षा अव्वल ठरला आहे, ही फायद्याची शेती डोळ्यासमोर ठेवून अजून 20 एकरात सीताफळ लागवड करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी ते पीक देखील हातात पडणार आहे. दरवर्षी दोन कोटी रुपयांचे उत्पादन होण्याची शक्यता धर्यशील सोळुंके यांनी व्यक्त केली आहे. नफ्याची ही शेती बघण्यासाठी राज्यभरातून शेतकरी काडीवडगाव येथे येत आहेत. सीताफळाची ही बाग शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

दुष्काळावर रामबाण उपाय- धर्यशील सोळुंके

ऊस, कापूस या नगदी पिकांमुळे शेतीचा पोत खालावत आहे. दरवर्षी शेतीचे उत्पादन घटत आहे. यावेळी पाऊस घटलेले उत्पादन आणि पिकांना मिळणारा बाजारभाव या मुळे शेतकऱ्याच आर्थिक गणित कोलमोडत आहे. यातून शेतकरी कर्जबाजाराच्या खाईत अडकून आत्महत्त्या करत आहे. एक पिक पद्धत ऐवजी वेगवेगळे प्रयोग करून तसेच फळबाग लागवड करून आर्थिक सुब्बता राखता येईल. सीताफळ लागवड हा उत्कृष्ट पर्याय होऊ शकतो कारण पहिले तीन वर्षेच बागेचे पोषण करावे लागते, अत्यंत कमी पाण्यात पदरात पडणारे हे पीक आहे. एकदा लावलेली बाग 100 वर्षांपर्यंत नफा पदरात टाकणार आहे, असे धर्यशील सोळुंके यांनी सांगितले.