बेळगाव महापालिकेसमोर पुन्हा बेकायदा लाल-पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी पुन्हा एकदा बेळगाव महापालिकेसमोर बेकायदेशीर व अनधिकृत लाल-पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न काही कानडी संघटनांनी सोमवारी केला. कानडी संघटनेच्या दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

गेल्या वर्षी दि. 28 डिसेंबर रोजी काही कन्नडिगांनी बेळगाव महापालिकेसमोर पोलिसांच्या आशीर्वादाने, बेकायदा लाल-पिवळा ध्वज उभारला होता. हा ध्वज हटविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने कायदेशीररीत्या आंदोलन केले होते. मात्र, अद्यापही हा बेकायदेशीर ध्वज बेळगाव प्रशासनाकडून हटविण्यात आलेला नाही. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत हा ध्वज ऊन, वारा व पावसाने फाटल्याचे कारण सांगत नवीन ध्वज लावण्याचे निमित्त करून कानडी संघटनांनी राडा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.