प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक तरुण मजुमदार यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून मध्यमवर्गीय कुटुंबांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक तरुण मजुमदार यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी मजुमदार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

तरुण मजुमदार यांनी अलोर पिपाशा या चित्रपटामधून दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी उत्तम कुमार, सुचित्रा सेन, छबी बिस्वास, सौमित्र चटर्जी आणि संध्या रॉय या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. 1976 साली त्यांच्या प्रदर्शित झालेल्या बालिका वधू या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पंचन स्वर्गो (1962), निमंत्रण (1971), गणदेवता (1978), दादर कीर्ती (1980) आणि अरण्य आमरी (1985) सारख्या हिट चित्रपटांसाठी त्यांनी चार राष्ट्रीय आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार पटकावले. त्यांचा गणदेवता हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला बंगाली चित्रपट होता. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल दिग्दर्शक मजुमदार यांना 1990 साली पद्मश्री पुरस्काराने तर 2021 साली त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले होते.