
विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ उद्या शारजा येथे ओएन मॉर्गन याच्या कोलकाता नाइट रायडर्स या संघाशी दोन हात करणार आहे. या दोन संघांमध्ये होणारी ही लढत इलिमिनेटर असणार आहे. त्यामुळे जो संघ पराभूत होईल त्या संघाला स्पर्धेबाहेरचा रस्ता पकडावा लागणार आहे. या लढतीत विजयी होणारा संघ क्वॉलिफायर टू या लढतीसाठी पात्र होईल. बघूया या स्पर्धेमधून कोणत्या संघाचा पत्ता कट होतोय आणि कोणता संघ आगेकूच करतोय ते…
केकेआरचे पारडे जड
कोलकाता नाइट रायडर्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये आतापर्यंत 28 लढती झालेल्या आहेत. कोलकाता नाइट रायडर्स या संघाने यामधील 15 लढती जिंकल्या आहेत. उर्वरित 13 लढतींमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारली आहे. आयपीएल लढतींचा इतिहास पाहता महत्त्वाच्या लढतीआधी कोलकाता नाइट रायडर्स संघाचे पारडे किंचित जड आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
यूएईतील लेगमध्ये झोकात पुनरागमन
कोलकाता नाइट रायडर्ससाठी आयपीएलचा यूएईत खेळवण्यात येत असलेला उर्वरित मोसम फायदेशीर ठरला आहे. हिंदुस्थानात पार पडलेल्या याआधी सत्रात कोलकाता नाइट रायडर्सला सपाटून मार खावा लागला होता. पण यूएईतील लढतींमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने झोकात पुनरागमन केले. या संघाने यूएईत पार पडलेल्या सातपैकी पाच लढतींमध्ये विजय मिळवत एकूण 14 गुणांसह प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.
कर्णधार म्हणून असू शकते अखेरची लढत
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धची इलिमिनेटर लढत ही विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार म्हणून अखेरची लढत असू शकते. विराट कोहली या मोसमानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नेतृत्वपदावरून माघार घेणार आहे. या लढतीत पराभूत झाल्यानंतर या संघाचे आव्हान येथेच संपणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा अखेरचा सामना ठरू शकतो. मात्र उद्याच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ विजयी झाल्यास त्यांना क्वॉलिफायर टू या लढतीसाठी पात्र होता येईल. तसेच त्या लढतीतही विजयी झाल्यानंतर या संघाला फायनल गाठता येणार आहे.
आजची इलिमिनेटर आयपीए लढत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-कोलकाता नाइट रायडर्स
शारजा, सायंकाळी 7.30 वाजता






























































