
सामना प्रतिनिधी । मुंबई
पूर्वार्धात 9-16 अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या बेंगळुरू बुल्स संघाने उत्तरार्धात पवन शेरावतच्या दमदार चढायांच्या जोरावर गुजरात फॉर्च्युनजायंटस्ला 38-33 अशा फरकाने धूळ चारली आणि पहिल्यांदाच प्रो कबड्डी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. दुसर्या मोसमात यू मुंबाकडून अंतिम फेरीत हार सहन करावी लागल्यामुळे बेंगळुरू बुल्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र त्यांनी दबावाखाली जबरदस्त खेळ केला. गेल्या वर्षी पाटणा पायरेटस्कडून पराभूत झाल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या गुजरात फॉर्च्युनजायंटस्ला सलग दुसर्या वर्षी दुसर्या क्रमांकावरच राहावे लागले. विजेत्या संघावर तीन कोटींचा तर उपविजेत्या संघावर 1.8 कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला.
स्पर्धेतील पारितोषिकवीर
पदार्पणातील सर्वोत्तम खेळाडू सिद्धार्थ देसाई
सर्वोत्तम चढाईपटू परदीप नरवाल
सर्वोत्तम बचावपटू नितेशकुमार
व्हॅल्यूएबल खेळाडू पवन शेरावत


























































