परळच्या बेस्ट वसाहतीच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 33 लाख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

परळच्या बेस्टच्या वसाहती खंगल्या असून कर्मचारी जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. या वसाहतींची केवळ तात्पुरती डागडुजी केली जात असून त्यांच्या सर्वांगीण पुनर्विकासाबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनेने बेस्ट समितीच्या बैठकीत मंगळवारी केली. यासंदर्भात सर्व वसाहतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असून त्यांच्या दुरुस्तीकरिता 1 कोटी 33 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी स्पष्ट केले आहे.

परळमधील बेस्ट वसाहतीची पुरती दुर्दशा झाल्याचा मुद्दा शिवसेना सदस्य अनिल कोकीळ यांनी आज बैठकीत मांडला. या वसाहतीच्या प्रसाधनगृहांचे लाकडी दरवाजे खराब झाले असून ते बदलण्याचे काम प्रचंड रेंगाळले आहे. या इमारती 60 वर्षे जुन्या असून अनेक ठिकाणी प्लॅस्टर कोसळू नये म्हणून ताडपत्री लावण्यात आली असल्याचे कोकीळ यांनी सांगितले. तर भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी या इमारतींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासनाने काही पावले उचलली आहेत का, असा सवाल केला. या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येत असून पूर्वी 1 कोटी 53 लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला तर आता 1 कोटी 33 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी स्पष्ट केले.