
मुंबईची दुसरी जीवनवाहिनी समजल्या जाणाऱया ‘बेस्ट’ बससेवेचा बोजवारा उडाला आहे. बेस्ट उपक्रमात वाहकांची जवळपास 8000 पदे रिक्त असल्याने त्याचा बेस्टच्या बसफेऱ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईकरांचा बेस्टच्या थांब्यावरील प्रतीक्षा कालावधी दीड तासावर पोहोचला आहे. बेस्टमध्ये चालक आणि वाहकांचे अपुरे मनुष्यबळ आहे. विशेषतः वाहकांची जवळपास 8000 पदे रिक्त आहेत. ही पोकळी पूर्णपणे भरून काढण्याऐवजी बेस्ट उपक्रमाने तब्बल 8 वर्षांनंतर वाहकांच्या अवघ्या 364 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. संपूर्ण मुंबई शहरात बेस्टचे एकूण 27 आगार आहेत. या सर्व आगारांच्या बसमार्गांचा विचार करता नवीन भरती प्रक्रिया पूर्ण होऊनही बसफेऱयांचे योग्य नियोजन करता येणार नसल्याचे मत ‘आपली बेस्ट आपल्यासाठीच’ संस्थेचे अध्यक्ष रुपेश शेलटकर यांनी व्यक्त केले.



























































