वेट लीजच्या बसेसवर बेस्टचाच चालक नेमा; बेस्ट कामगार सेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बेस्टने वेट लीजवर खासगी बसेस घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या बसेसवर खासगी चालक आणि वाहक बेस्टचा असणार आहे. मात्र या बसेसवर खासगी ड्रायव्हर न ठेवता बेस्ट उपक्रमाचाच ड्रायव्हर नेमावा अशी मागणी बेस्ट कामगार सेनेने गुरुवारी वेतन कराराबाबत झालेल्या बैठकीत केली. शारीरिकदृष्टय़ा अपात्र कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा भरती, नैमत्तिक सेवेत कायम करावे, प्रवेश श्रेणीवरील रिक्त जागा भराव्यात आदी मागण्या यावेळी बेस्ट कामगार सेनेने केल्या आहेत.

बेस्टचा 2016 पासून रखडलेल्या वेतन कराराबाबत नवीन कायद्यामुळे सर्व युनियनशी बेस्ट प्रशासनाची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्टला संकटातून बाहेर काढण्यासाठी अनुदान जाहीर केले आहे. 11 जून रोजी झालेल्या सामंजस्य करारानंतर वेट लीजच्या सात हजार बसेसचा समावेश बेस्टमध्ये टप्पाटप्प्याने होणार आहे. ‘बीआयआर’ कायदा रद्द झाल्यामुळे शशांक राव यांच्या वर्कर्स युनियनचा एकटय़ाने वेतन करार करण्याचा अधिकार संपुष्टात आल्यामुळे सर्व युनियन समान पातळीवर आल्या आहेत. त्यामुळे बेस्टच्या बहुतांश युनियन एकत्र करीत परिपूर्ण करार करावा यासाठीची कामगार सेनेची पहिली बैठक गुरुवारी पार पडली. आता 14, 21 आणि 22 ऑगस्ट रोजी पुढील बैठका होणार असल्याचे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी म्हटले आहे.

ताफ्यात 10 इलेक्ट्रिक एसी बस

बेस्टच्या ताफ्यात 10 इलेक्ट्रिक एसी बसगाडय़ा दाखल झाल्या आहेत. वाहतूक विभागाच्या परवानगीनंतरच या बसगाडय़ा रस्त्यांवर धावणार आहेत. मुंबईकरांच्या सेवेत आगामी काळात तब्बल सात हजार बसगाडय़ा दाखल होणार आहेत.