सुटय़ा पैशांचा असाही फटका, बेस्टचा अर्धा पगार रोखीने दिल्याने बँका कर्ज देईनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्टकडे जमा होणाऱया सुटय़ा पैशांच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. बेस्ट कामगारांना पगारातील 15 हजार नोटांच्या स्वरूपात तर एक हजार रूपये नाण्यांच्या म्हणजे चिल्लर स्वरूपात स्विकारावे लागत आहेत. आणि उर्वरित पगार त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जात आहे. मात्र, अशा प्रकारचा अर्धा पगार रोखीने तर अर्धा बँकेत जमा केल्याने बेस्ट कर्मचाऱयांना कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार नसल्याची निराळीच समस्या सामोरी आली आहे.

बेस्ट परिवहन सेवेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्टचे किमान तिकिट गेल्यावर्षी जुलै महिन्यापासून पाच रूपये केल्याने बेस्टकडे सुटय़ा पैशांचा रतीब सुरू झाला आहे. त्यामुळे एवढय़ा सुट्टय़ा नाण्यांचे करायचे काय, असा प्रश्न बेस्ट समोर उभा राहिला होता. सुरूवातीला ही सुटी नाणी बेस्टकडून बँका स्वीकारत होत्या. नंतर बँकांनीही सुटी नाणी स्विकारण्यास हात आखडता घेतला आहे. त्यानंतर बेस्टने नागरीकांना सुट्टी नाणी देण्यासाठी खास काऊंटर उघडले, परंतू त्यालाही काही दिवसांनी प्रतिसाद मिळणे बंद झाले. त्यांनतर बेस्टने त्यांच्या कर्मचाऱयांना डेपोमध्ये रांगेने उभे करून त्यांचा पगार सुट्टय़ा पैशांमध्ये देण्यास सुरुवात केली.

बेस्टचा ऑक्टोबर महिन्याचा पगार 11 नोव्हेंबर रोजी देण्यात आला, तोही अर्धा पगार डेपोत रोखीने तर अर्धा पगार बँकेत कर्मचाऱयांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. 15 हजाराची रक्कम कमी मूल्यांच्या नोटांच्या (उदा.5 रू.,10 रू.,20रू., 50रू.) स्वरूपात तर एक हजार रूपये प्लास्टीकच्या पिशवीत (तेही काऊंटरवरच मोजून घेण्याच्या अटीसह) देण्यात येत आहेत. तर उरलेला 16 हजार रूपयांचा पगार बँकेत जमा केला जात आहे. अशा अर्ध्या वेतनाच्या स्लिपमुळे कोणत्याही बँका बेस्ट कर्मचाऱयांना गृहकर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज मंजूर करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे सुट्टय़ा पैशांवर लवकर तोडगा काढून संपूर्ण पगार कर्मचाऱयांच्या अकाऊंटवर जमा करण्याची मागणी होत आहे.